वसई: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पोलीस असल्याचं भासवून, दरोडा टाकणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा क्रमांक 3 च्या युनिटने जेरबंद केले आहे. या टोळीनं राष्ट्रीय महामार्गावर 26 फेब्रुवारीला एका व्यापाऱ्याला 25 लाखाला लुटलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी 9 आरोपींना अटक करण्यात यश मिळवलं आहे.
26 फेब्रुवारीला अंधेरी येथील व्यापारी अरिहंत पोबवाल याला कोविड साथीच्या अनुंषघाने कोविडचे साहित्य खरेदी करायचं होतं. पोबवालचा मित्र असलेला आरोपी पार्थ जानी याने त्याच्या वाळीव येथील मित्राकडे चांगले कोविडचे साहित्य आहेत. तेथे स्वस्तात मिळतील. मात्र त्याला 25 लाख दाखवावे लागतील, असं सांगून 25 लाख आणायला सांगितलं. खरेदी करण्यासाठी पार्थ ने आपला मित्र रब्बानी मेहम्मुद याला ही घेतलं. हायवेवर गोदाम दाखवण्यासाठी मनोहरलाल पटेल उर्फ गिरीश वालेचा हा ओला गाडीत आलेला.
हे तिघे गाडीत बसल्यावर वर्सोवा पासून पुढे हायवेवर जात असताना एका धाब्याच्या जवळ त्यांची गाडी एका स्कॉर्पिओ गाडीने अडवली, त्या गाडीत एकूण पाच जण होते. त्यातील दोघे हे पोलीसांच्या ड्रेस मध्ये होते. त्यांनी त्यांची गाडी अडवून व्यापाऱ्याला चौकशीसाठी बोलावलं आहे, असं सांगून गाडीत भरलं आणि त्याला मारहाण करुन त्याच्या जवळचे 25 लाख लुटून पोबारा केला. क्राईम ब्राँच 3 च्या युनिटला त्याच्या बरोबर असणाऱ्या लोकांचा संशय आल्याने पोलिसांनी अधिक तपास केल्यावर ही हायवेवर लुटणारी टोळी असल्याच स्पष्ट झालं. याप्रकरणी 9 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. काही आरोपींना पोलिसांनी अजमेरला जावून अटक केली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी पार्थ जानी, रब्बानी परेल, अब्दुल हमीद सैय्यद, गिरीश वालेचा उर्फ मनोहर पटेल, इमरान अहमद शेख, स्मितेश गवस, सुरेश दळवी, संतोष मोरे, विनय सिंह या नऊ आरोपींना अटक केलं आहे.