मुंबई : लसीकरण सुरू झाल्यापासून सर्व केंद्रावर गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे हीच लसीकरण केंद्रे सध्या सुपर स्प्रेडरचे काम करत नाहीत ना असा प्रश्न निर्माण झालाय. लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी ही धोक्याचा इशारा आहे. त्यावर वेळीच आळा घालावा लागणार आहे.


1 मार्चपासून सर्वत्र 60 वर्षांवरील आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पण आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना लस देण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. मात्र, अचानक सुरू केलेल्या या लसीकरणामुळे सर्वत्र गोंधळ सुरू होता. एकीकडे अॅप चालत नव्हते तर दुसरीकडे सरकारी पातळीवर नीट व्यवस्था नव्हती. अश्यात लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तींनी अजिबात शिस्त न दाखवता गर्दी केली. मात्र, यात कोणीही विचार केला नाही की यात जर एखादा माणूस जरी पॉजिटिव्ह असला तरी सर्वांना धोका होऊ शकतो. "लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 45 दिवसांनी आपल्यात प्रतिकार शक्ती निर्माण होण्यास सुरुवात होते. तोपर्यंत आपल्याला कोरोना होऊ शकतो. त्यामुळे लसीकरणासाठी येताना, सुरक्षित अंतर राखणे, मास्क वापरणे आणि सॅनिटायझर वापरणे अनिवार्य आहे, असे न केल्यास तुम्ही लसीकरण केंद्रावरच सुपर स्प्रेडरच्या संपर्कात येऊ शकता, किंवा तुम्ही स्वतः देखील सुपर स्प्रेडर होऊ शकता", असे ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार यांनी सांगितले आहे.



लस घेऊन देखील कोरोना होऊ शकतो हे आता सर्वांनाच माहीत आहे. लसीकरण होत असताना देखील अनेकांना पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना झालेला आहे. अश्या या परिस्थितीत अनेकजण स्वतः स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत.


महत्वाचे :




  • कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठ नागरिकांना आणि ज्यांना रक्त दाब, मधुमेह, मूत्रपिंड आणि हृदयरोग आहेत त्यांना आहे.

  • सरकारने तिसऱ्या फेजमध्ये याच नागरिकांना लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे.

  • त्यात ज्या नियोजनबद्धपणे पहिल्या आणि दुसऱ्या फेजमध्ये लसीकरण झाले, दुर्दैवाने तिसऱ्या फेजमध्ये कुठेही सरकारी पातळीवर नियोजन आढळले नाही. परिणामी सर्वत्र गोंधळ दिसून आला.

  • जर या लसीकरणाच्या गर्दीमध्ये सुपर स्प्रेडर असल्यास त्याचे परिणाम दिसायला अजून काही दिवस जाऊ शकतात. मात्र, असे असले तरी घाबरून जाऊन घरीच बसणे देखील योग्य नाही. लस ही प्रत्येकाने घ्यायलाच हवी. मात्र, त्यासाठी सरकारने दिलेल्या त्रिसूत्रीचे पालन करणे देखील महत्वाचे आहे. ते केले तरच लसीकरणाचा फायदा भारतीयांना होऊ शकतो.