मुंबई : कुणी रेड लाईट एरिया म्हणतं, तर कुणी वेश्यावस्ती अशा या गल्ल्यांमधले मेकअपचे थरावर थर थापलेले निब्बर चेहरे... यांना कुणी निरागस म्हणणार नाही. यांच्यातली निरागसता मेलीय. रोज शरीरात घुसवल्या जाणाऱ्या एका सुईने रोज कणाकणाने ही निरागसता मारली जाते आणि निव्वळ वापरासाठीचं बाईचं  निब्बर शरीर निर्माण होतं.

इथे येऊन पोट भरायचं तर आकर्षक दिसावंच लागेल. पण, इथे आकर्षकतेच्या व्याख्या वेगळ्या आहेत. 14-15 वर्ष वयाची पोरसवदा कोवळी नजाकत इथे कामाची नाही. काम करायला पोटऱ्या-मांड्यांमध्ये निब्बरपणा हवा आणि म्हणूनच कुणी छाती मोठी करण्यासाठी, मांड्यांना आकार येण्यासाठी वेगवेगळी औषधं घेतात.

शरीरावरच्या उभारांना आणखी उभारी देण्यासाठी, रंग गोरा करण्यासाठी, पन्नाशीतही कातडी सैल पडू नये यासाठी इथे एक भयानक रसायन वापरलं जातं... त्याचं नाव यांना निश्चित माहित नाही... काही लोक हे औषध इथे आणून विकतात. काहीजण म्हणतात हे आयुर्वैदिक आहे, तर काही जण महिन्याला एक इंजेक्शन घेतात. या भयानक रसायनाचं नाव आहे ऑक्सिटोसिन.

ऑक्सिटोसिन फक्त या लालबत्तीपुरतंच मर्यादित राहिलेलं नाही हे तुमच्या-आमच्या घरातही येतंय. तुम्ही घरी आणत असलेल्या भाज्या, फळं, दूध हे स्वच्छ आहे की नाही हे नक्कीच बघत असाल. पण, तुमच्या घरी येणाऱ्या भाज्या, फळं आणि दूधातून तुमच्या शरीरात स्लो पॉयझन मिसळलं जातंय. कर्करोग होण्यास कारणीभूत असलेलं हे विष औषधाच्या नावाखाली अगदी सहजरित्या कोणत्याही मेडिकल स्टोअरवर उपलब्ध होतंय...त्याचं नाव आहे ऑक्सिटोसीन...

काय आहे ऑक्सिटोसीन?

हे एक संप्रेरक आहे... प्रसूतीच्या वेळी होणाऱ्या अतिरिक्त रक्तस्रावाला प्रतिबंध करण्यासाठी देण्यात येतं. तसंच, स्तनपानासाठीही हे उपयुक्त आहे. याची 0.5 मीमी एवढीच मात्रा पुरेशी असते. हे इंजेक्शन प्रिस्क्रिप्शनशिवाय पुरवू नये, असा आदेश असूनही सर्रास विक्री होत आहे. या इंजेक्शनचा वापर केवळ डॉक्टरांकडूनच व्हावा, असंही त्यात म्हटलं आहे.

कसा होतोय ऑक्सिटोसीनचा दुरुपयोग?

अल्पवयीन मुलींचे लैंगिक अवयव वेगाने वाढवण्यासाठी सेक्स माफियांकडून गैरवापर केला जातो.

दुभत्या जनावरांचे दूध वाढवण्यासाठी गैरवापर होतोय, त्यामुळे कर्करोगाची भीती आहे.

भाजी, फळं वेगाने वाढण्यासाठी गैरवापर होते. त्यामुळेही कर्करोगाची भीती असल्याचं तज्ञ सांगतात. तज्ञांच्या मते, ऑक्सिटोसीनचा जास्त वापर धोकादायक आहे. यामुळे व्यसन नसलेल्या माणसालाही कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढत आहे. कारण, ऑक्सिटोसीनचा मोठा वाटा फळं, भाज्या, दूध यामध्ये आहे.

औषधांच्या दुकानात या इंजेक्शनच्या होणाऱ्या विक्रीमुळे याचा दुरुपयोग होण्याची भीती ऑल फुड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशनने व्यक्त केली आहे. याविरोधात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. यावर योग्य निर्बंध घालण्याची मागणी करण्यात आली आहे. खरंतर पूर्वी हे इंजेक्शन फक्त डॉक्टर आणि रुग्णालयांमध्येच उपलब्ध असायचं. आता सरकारने धोरण बदलल्याने ते औषधांच्या दुकानांमध्येही उपलब्ध झालंय.

ऑक्सिटोसीनचा गैरवापर थांबावा आणि त्याची कमतरताही भासू नये यासाठी वेगवेगळे नियम करण्यात आले आहेत. ऑक्सिटोसीन खुलेआम मिळत असलं तरी त्याचा गैरवापर रोखण्यासाठी प्रशासनाने कागदावर दिसणारे बरेच नियम तयार केले आहेत.

नियम तयार केले असले तरी प्रशासनाच्या नाकाखाली प्रिस्क्रीप्शन आणि कोणत्याही चौकशी शिवाय ऑक्सिटोसीन अगदी सहजरित्या मिळतंय. तेही निव्वळ 17 रुपयांत... कसं ते या व्हिडीओमध्ये पाहा...