ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने सर्व कडक निर्बंध लावले असून सुद्धा ठाण्यामध्ये राजरोसपणे डान्स बार सुरू होते. ठाण्यामधील सुरू असलेल्या डान्सबारचे स्टिंग ऑपरेशन करून ती बातमी काल (सोमवारी 19 जुलै) दाखवल्यानंतर प्रशासनला जाग आली. त्यानंतर तातडीने कारवाईचे सत्र सुरू झाले. हाच कारवाईचा धडाका पुढे नेत ठाणे महानगरपालिकेने शहरातील 15 लेडीज बार सील केले आहेत.


19 जुलैला संध्याकाळी डान्सबारची बातमी दाखवल्यानंतर सगळ्यात आधी ठाणे पोलीस आयुक्तालयातील दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात आलं तर दोन सहाय्यक पोलीस आयुक्त यांची कंट्रोल रूमला बदली करण्यात आली. तसेच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तीन दिवसांमध्ये या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.


पोलिसांनी या प्रकरणात संबंधित बारवर गुन्हा दाखल करत त्यांचे परवाने रद्द करण्यासाठी महसूल विभागाला विनंती केली असून त्यांचे बार सील करण्याचे निवेदन ठाणे महानगरपालिकेला देण्यात आले होते, याची तातडीने दखल घेत ठाणे महानगरपालिकेने ठाण्यात सुरू असलेल्या 15 लेडीज बारवर कारवाईचा धडाका लावला.


राज्यात सामान्यांसाठी लागणाऱ्या गोष्टी आणि उद्योगांवर बंदी असूनही हे डान्सबार राजरोसपणे सुरू होते. स्थानिक प्रशासनाला याची कुणकुणही नव्हती का? असा सवाल आता विरोधी पक्षाकडून उपस्थित केला जातोय. इतकंच नाही तर ठाण्याचे पोलीस आयुक्त यांना निलंबित करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. तर फक्त पोलिस विभागावर नाही तर इतर संबंधित विभाग आहेत. त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्याची मागणी भाजप नेते प्रसाद लाड यांनी केली आहे.


साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम 1897 तसेच आपत्ती व्यवस्था कायदा 2005 च्या सर्व संबंधित तरतुदीनुसार शासनाने कोविड-19 आजाराचा प्रसार रोखण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या त्रिसुत्रीचे पालन करणे, सर्व बार अँण्ड रेस्टॉरंट, लेडिज बार व इतर सोमवार ते शुक्रवार 50 टक्के बैठक क्षमतेने सायं 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे तसेच सायं 4 वा.नंतर व शनिवार आणि रविवार फक्त टेक अवे, पार्सल सुविधा व होम डिलिव्हरी सेवा सुरु ठेवण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन केलेल्या 15 आस्थापना महापालिकेने आज सील केल्या.


या कारवाई अंतर्गत ठाण्यातील तलावपाळी येथील आम्रपाली बार, तीन पेट्रोल पंप येथील अ‍ॅन्टीक पॅलेस बार, उपवन येथील नटराज बार, सिनेवंडर येथील आयकॉन बार, कापुरबावडी येथील स्वागत बार, नळपाडा येथील नक्षत्र बार, पोखरण रस्ता क्रमांक दोन येथील के-नाईट बार, ओवळा नाका येथील स्टरलिंग बार, मॉडेला नाका येथील अ‍ॅन्जेल बार, उपवन येथील सुर संगम बार, भाईंदरपाडा येथील खुशी आणि मैफील बार, वागळे इस्टेटमधील सिझर पार्क बार, नौपाड्यातील मनिष बार आणि कापूरबावडी येथील सनसिटी बार असे एकूण 15 लेडीजबार सील करण्यात आले आहे.


सदरच्या सर्व कारवाया अतिक्रमण व निष्कासन विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ. अनुराधा बाबर, प्रणाली घोंगे, शंकर पाटोळे आणि विजयकुमार जाधव यांनी महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या मदतीने केल्या आहेत.