मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला. पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश ए.सी. डागा यांनी सूरज चव्हाण यांचा जामीन नाकारला. कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीने सूरज चव्हाण यांना अटक केली असून 17 जानेवारी 2024 पासून सूरज चव्हाण तुरुंगात आहेत. 


प्रत्येक पॅकेटमध्ये कमी खिचडी भरल्याचे पुरावे जरी नसले तरी कंत्राट मिळवताना पालिकेची फसवणूक केल्याचं स्पष्ट आहे असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे. तसेच आरोपीचा हे कंत्राट मिळवताना पहिल्यापासून शेवटपर्यंत सहभाग असल्याचे पुरावे असल्याचंही कोर्टाने मान्य केलं आहे. 


खिच़डी कंत्राटाच्या 3.64 कोटी रूपयांपैकी 1.25 कोटी रूपये सूरज चव्हाणच्या वैयक्तिक खात्यात तर 10 लाख रूपये अन्य कंपनीच्या खात्यात जमा केल्याचा आरोप ईडीने केला आहे. या प्रकरणी आपल्याकडे पुरावा असल्याचा दावाही ईडीने कोर्टात केला आहे. 


खिचडी घोटाळ्याची ईडीकडून चौकशी


कोविड काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी आधी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने  सूरज चव्हाण (Suraj Chavan) आणि अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांची चौकशी केली होती. त्यानंतर सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली. आया प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीकडे असून अमोल कीर्तीकर यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.


किरीट सोमय्या यांनी केले होते आरोप


कोरोना काळात स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी, ज्यांचे मुंबईत घर नाही अशा कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय त्यावेळच्या सरकारने घेतला होता. केंद्र सरकारनेही त्याला पाठिंबा दिला होता. मुंबई महापालिकेने एकूण 52 कंपन्यांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. सुरुवातीच्या चार महिन्याच्या काळात चार कोटी खिचडी पॅकेट्स वाटण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. या कामात घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचे नाव यामध्ये घेण्यात आलं होतं.  


ही बातमी वाचा: