मुंबई : पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीनं शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण राऊत यांची 72 कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. पीएमसी बँकेतील 4 हजार 300 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी ईडी तपास करत आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं प्रवीण राऊत यांना गेल्या फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. पीएमसी बँकेचे 90 कोटी रुपये हडपल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या अकाउंटवरून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर 55 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. हा व्यवहार का करण्यात आला होता याचं उत्तर ईडीला हवं आहे. याचसाठी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. ज्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं. आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आणि विरोधकांवर नेहमीच शाब्दिक हल्ला चढवणारे संजय राऊत संतापले.
प्रवीण राऊत संजय राऊत यांचे कौटुंबिक मित्र मानले जातात. तर एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळाशी संबंधित असलेले वाधवान कुटुंबियांशी सुद्धा त्यांची जवळीक आहे. प्रवीण राऊत यांनी पीएमसी बँक घोटाळाचे 90 कोटी रुपये हडपले असा आरोप ईडीने केला आहे. प्रवीण राऊत यांची कंपनी गुरुआशिष कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांचा व्यवहार एचडीआयएलसोबत होते. या व्यवहारमुळेच प्रवीण राऊत यांची एचडीआयएल कंपनीशी संबंध वाढले. प्रवीण राऊत यांचा एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळ्यात सहभाग असल्याची खात्री ईडीला आहे.
शिवसेना आक्रमक; ईडी विरोधात रस्त्यावर उतरणार?
प्रवीण राऊत यांनी आपली पत्नी माधुरीच्या अकाउंटवर 1.6 कोटी रुपये ट्रान्सफर केले. जे पीएमसी बँक घोटाळ्यातील रक्कम असल्याचा दावा ईडीकडून केला गेला आहे. त्याच 1.6 कोटी रुपयांमधून माधुरी यांनी संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना 55 लाखाचं कर्ज बिनव्याजी दिले. 50 लाख 23 डिसेंबर 2013 तर 5 लाख 15 मार्च 2011 दिले. दादरमधील एक फ्लॅट विकत घेण्यासाठी वर्षा राऊत यांनी माधुरी राऊत यांच्याकडून हे कर्ज घेतल्याची माहिती संजय राऊत यांनी 2016 मध्ये राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा दिली होती. इतकंच नाही तर अवनी कन्स्ट्रक्शनमध्ये माधुरी राऊत आणि वर्षा राऊत या दोघी पार्टनर आहेत. अवनी कन्स्ट्रक्शनमधून सुद्धा वर्षा राऊत यांना बारा लाख रुपये कर्ज म्हणून देण्यात आले आहेत.
प्रवीण राऊत यांची 72 कोटींची मालमत्त जप्त केल्याची माहिती ईडीने ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. हा पीएमसी बँक कर्ज प्रक्रियेत घोटाळा करून मनी लाँड्रिंग कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हणत ही संपत्ती ईडीने जप्त केली आहे. त्यामुळे प्रवीण राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं होतं. त्यांना 29 डिसेंबर रोजी ईडीच्या बॅलार्ड पिअर येथील कार्यालयामध्ये हजर होण्याचे सांगितले होते. मात्र, संजय राऊत यांनी ईडीकडे यासाठी मुदत मागितली होती. त्यानुसार वर्षा राऊत यांना दुसरे नवे समन्स ईडीने पाठवले असून 5 जानेवारीला चौकशीसाठी बोलावले आहे.
संबंधित बातम्या