मुंबई: अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत. येत्या 24 डिसेंबरला शिवस्मारकाचं भूमिपूजन होणार असून, मोदी अरबी समुद्रात जिथे स्मारक होणार तिथे जाऊन भूमिपूजन करणार आहेत.


आघाडी सरकारच्या काळात अरबी समुद्रात शिवस्मारक बांधण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती. मात्र केंद्रीय परवानग्याविना ते रखडलं होतं.

केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आल्यानंतर केंद्राकडून परवानग्या मिळाल्या. त्यानंतर आता भूमिपूजनाचाही मुहूर्त ठरला आहे.

कसं असेल समुद्रातील शिवस्मारक?

अरबी समुद्राच्या मध्यभागी असलेल्या भल्यामोठ्या खडकावर शिवस्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या आहेत.

शिवाजी महाराजांच्या कार्याची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावी, यादृष्टीने भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. अमेरिकेतील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभा करण्यात येणार आहे.

त्या दृष्टीने सरकारच्या हलचाली सुरु झाल्या आहेत. सरकारने विनायक मेटेंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.

16 एकर जमीन

शिवस्मारकासाठी मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळ अरबी समुद्रात 16 एकर जमीन निवडली आहे. हे स्मारक सुमारे 309 फूट उंच असेल. समुद्रात तीन एकर क्षेत्रावर भर घालून चबुतरा उभारण्यात येणार आहे. त्या परिसरात येणाऱ्या पर्यटकांना शिवाजी महाराजांबाबतची माहिती देणारी दालने, पुस्तक प्रदर्शन, चित्रफीत दाखविण्यासाठी दालन, वस्तुसंग्रहालय आणि उद्यान असा आराखडा आहे.

स्मारकाची जागा राजभवनपासून दक्षिण-पश्चिम बाजूस 1.2 कि.मी अंतरावर, गिरगाव चौपाटीवरील एच.टु. ओ जेट्टीपासून दक्षिण-पश्चिम दिशेने 3.60 कि.मी अंतरावर आणि नरिमन पाँईटपासून पश्चिमेस 2.60 कि.मी अंतरावर आहे.

स्मारकासाठी 15.96 हेक्टर आकारमानाचा खडक निवडण्यात आला आहे. याचे क्षेत्रफळ अंदाजे 650 मी द325 मी. एवढे आहे. सभोवताली 17.67 हेक्टर जागा उथळ खडकाची आहे.

काम दोन टप्प्यात

शिवस्मारकाचं काम दोन टप्प्यात केलं जाणार आहे. पहिला टप्पा 2019 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती यापूर्वी विनायक मेटेंनी दिली होती. पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांच्या पुळ्याचा समावेश असेल. तर दुसऱ्या टप्प्यात आर्ट गॅलरी, म्युझियम, गड-किल्ल्यांचा देखावा, शिवचरित्र अशा अनेक गोष्टींचा समावेश असेल.

संबंधित बातम्या
शिवस्मारकासाठी 3600 कोटी रुपये, लवकरच भूमीपूजन

समुद्रातील शिवस्मारकाला केंद्राचा हिरवा कंदील, आज अधिसूचना जारी होणार