मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या (Lok sabha Election Result)  निकालानंतर मोदी पहिल्यांदाच मुंबईत (PM Modi In Mumbai)  येतायत. मोदींच्या हस्ते मुंबईतील विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन आज संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. त्यात मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचा समावेश आहे. तसंच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या कामाचं भूमिपूजनही मोदी करणार आहेत. 


वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई पालिकेने गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याचे काम हाती घेतले असून हा प्रकल्प चार टप्प्यांत पूर्ण केला जात आहे. या गोरेगाव फिल्मसिटी-खिंडीपाडापर्यंतच्या बोगद्याचे काम वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. या कामाचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल. तसेच, मुंबईकरांना निर्जंतुकीकरण केलेले पाणी भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून उपलब्ध पुरवले जाते. या केंद्राचे आयुर्मान संपुष्टात येत असल्याने ते नव्याने बांधण्यात येणार आहे. याचेही भूमिपूजन होणार आहे.


कसा आहे प्रकल्प?


मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पूर्व आणि पश्चिम उपनगरांना रस्ते मार्गाने जोडण्याच्या उद्देशाने महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (लिंक रोड) प्रकल्प (जीएमएलआर) हाती घेण्यात आला आहे. सुमारे 12.20 किलोमीटर लांबीच्या या संपूर्ण प्रकल्पामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यान प्रवासाची वेळ 75 मिनिटांवरुन 25 मिनिटांवर येईल. या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी 4.7 किलोमीटर अंतराच्या जुळा बोगद्याची निर्मिती केली जाणार आहे. 


जुळ्या बोगद्याचा फायदा 



  •  गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (लिंक रोड) प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी 4.7  किलोमीटर लांब आणि 45.70  मीटर रुंदीचा जुळा बोगदा

  •  जोड मार्ग आणि अन्य बाबींसह तिसऱ्या टप्प्यातील मार्गाची एकूण लांबी 6.65 किलोमीटर

  •  हा जुळा बोगदा जमिनीखाली 20 ते 160  खोल भागात असेल

  •   प्रत्येकी 300 मीटर अंतरावर दोन्ही बोगदे एकमेकांशी जोडले जातील 

  •  सुमारे 14.2  मीटर व्यासाच्या बोगदा खोदण्याच्या संयंत्राने (टीबीएम) होणार बोगद्याचे खोदकाम

  •  बोगद्यामध्ये अत्याधुनिक प्रकाशव्यवस्था, वायुविजन प्रणाली, अग्निरोधक यंत्रणा, सीसीटीव्ही, बोगद्याच्या दोन्ही दिशांना नियंत्रण कक्ष आदी सुविधांचा समावेश

  •   पर्जन्य जलवाहिनी, भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी लागणाऱ्या संभाव्य जलवाहिन्या आदी उपयोगिता वाहिन्यांची बोगद्याच्या खाली व्यवस्था

  •  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनस्पती, प्राणी तसेच आरे, विहार व तुळशी तलाव यांचे क्षेत्र बाधित न करता आणि त्यांना हानी न पोहोचवता बोगद्याचे बांधकाम होणार

  • प्रकल्पासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये भूसंपादन करण्यात आलेले नाही

  •    प्राण्यांच्या सुरक्षित विहारासाठी  पशूपथाची निर्मिती

  •  कार्बन उत्सर्जनात दरवर्षी सुमारे 22 हजार 400 टनांनी घट होणार

  •   मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत आणि इंधनाचीही बचत होणार


हे ही वाचा :


PM मोदी-पुतिन यांच्या रशियातील भेटीचं नाशिकला गिफ्ट; लढाऊ विमानांच्या निर्मित्तीबाबत मोठा निर्णय