मुंबई : दुधाच्या प्लॅस्टीक पिशव्यांवरील बंदी एका महिन्यात लागू होईल, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज विधानसभेत दिली. असे असले तरी पिशव्या पूर्णपणे बंद होणार नाहीत, दुधाची पिशवी घेतली, तर ती परत आणून दिल्यास ग्राहकाला 50 पैसे परत देण्याची तयारी दूध कंपन्यांनी दाखवली आहे. एका महिन्यात हे सुरु होईल, अशी माहिती कदम यांनी विधानसभेत दिली.

महाराष्ट्रात दिवसाला 1 कोटी दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्या रस्त्यावर येतात त्यातून 31 टन प्लॅस्टिक कचरा निर्माण होत असल्याचे कदम यांनी सांगितले. त्यावर उपाय म्हणून दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदी एका महिन्यात लागू करण्यात येणार आहे.

राज्यात प्लॅस्टिक बंदी लागू झाली, मात्र दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर अद्याप सुरू आहे, या गोष्टीकडे विधानसभेत काही आमदारांनी पर्यावरण मंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना कदम यांनी प्लॅस्टिक बंदीबाबतची माहिती दिली.

प्लॅस्टिक बंदीबाबतची माहिती देताना कदम यांनी सांगितले की, राज्यात 1200 टन प्लॅस्टीक कचरा निर्माण होत होता. प्लॅस्टीक बंदीनंतर यातील 600 टन प्लॅस्टिक कचरा कमी झाला. राज्यात सापडणारं प्लॅस्टिक हे बाहेरील राज्यातून येतं. यात गुजरातमधून 80 टक्के प्लॅस्टिक येतं. ते बंद करण्यासाठी मी स्वतः गुजरात सीमेवर जाऊन प्लॅस्टिक घेऊन येणाऱ्या ट्रकवर कारवाई केली आहे.

...तर बाटलीबंद दूध 10 ते 15 रुपयांनी महाग? | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा



रामदास कदम म्हणाले की, राज्यात 1 लाख 20 हजार 286 टन प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून 24 कंपन्या दिवसाला 550 टन प्लॅस्टीकवर प्रक्रिया करतात. तर सिमेंट कंपन्यांना 3 हजार टन प्लॅस्टिक वापरायला दिले आहे.

प्लास्टिक ग्लासचा वापर, मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात प्लास्टिकबंदीला केराची टोपली