मुंबई : बॅनर आणि टेम्प्लेटमधून  फोटो काढले जाऊ शकतात, मात्र आमच्या हृदयातून नाही. ठाकरे परिवाराच्या प्रत्येक व्यक्तीचा फोटो माझ्या हृदयात शेवटपर्यंत असणार, असे मत शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांनी व्यक्त केले आहे. 


एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून भाजसोबत सरकार स्थापन केले. त्यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. बंडखोरी केलेले काही आमदार थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. तर काही  आमदारांनी अद्याप सावध पवित्रा घेत उद्धव ठाकेर यांच्यावर टीका करण्याचे टाळले आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील बंडखोरी केल्यापासून थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली नाही. असे असतानाच आता त्यांनी ठाकरे परिवाराच्या प्रत्येक व्यक्तीचा फोटो माझ्या हृदयात शेवटपर्यंत असणार असे म्हटले आहे. 


 प्रताप सरनाईक म्हणाले, "दोन वर्षानंतर यंदा दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी होईल. त्यात आमचं सरकार आहे. सगळ्या सणांवरील निर्बंध या सरकारने बाजूला केले आहेत. हिंदुत्वाची दहीहंडी एकच तत्त्व हिंदुत्व या संकल्पनेवर हा उत्सव साजरा करत आहोत. मागील नऊ वर्षांपासून दहीहंडीला क्रीडा प्रकारात समावेश करावा अशी मागणी करतोय. सर्वसामान्यांचा गोविंदा आता मुख्यमंत्री झालेत. त्यामुळे पुढील पंधरा दिवसांमध्ये दहीहंडीचा राज्याच्या क्रीडा प्रकारात समावेश होईल." 


"पुढच्या वर्षीच्या दहीहंडी उत्सवापर्यंत दहीहंडीच्या स्पर्धा आयोजित केल्या जातील. जय जवान दहीहंडी पथकाचा आठ थरांचा रेकॉर्ड मोडेल त्याला आमच्याकडून एकवीस लाखांचे बक्षिस  जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.  


प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडी निमंत्रण पत्रिकेवर उद्धव ठाकरे यांचा फोटो नाही. याबाबत बोलताना सरनाईक म्हणाले, "आता हे आमचे सरकार आहे, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्यासोबत राहून हे उत्सव साजरा करत आहोत.  पेम्प्लेट आणि होर्डिंगसमधून फोटो काढले जातात, हृदयातून  काढले जात नाहीत. ठाकरे परिवाराच्या प्रत्येक व्यक्तीचा फोटो माझ्या हृदयात शेवटपर्यत असणार. 


दरम्यान, प्रताप सरनाईक यांनी रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलण्याचे टाळले. "याबाबत मलाही माहित नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचे उत्तर देऊ शकतील, अशी टोलवाटोलवी प्रताप सरनाईक यांनी यावेळी केली.