BMC Election 2022 : शिवसेनेत (Shiv Sena) बंडखोरी झाल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्रिमंडाळाचा विस्तार होताच मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election 2022) पार्श्वभूमीवर मोठी राजकीय उलथापालथ होण्याची दाट शक्यता आहे. तशा हालचाली सुरु झाल्या आहेत. मुंबईतील प्रत्येक बंडखोर आमदाराला प्रत्येकी चार ते पाच माजी नगरसेवकांना शिंदे गटात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती शिंदे गटातील सूत्रांनी दिली आहे. त्यासाठी सापळे रचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.


भाजप आणि शिंदे गटाने मुंबईत का लक्ष केंद्रित केले?
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सुमारे 50 हजार कोटी रुपयांचा आहे. या श्रीमंत महानगरपालिकेतील ठाकरेंची सत्ता उलथवून महापालिका ताब्यात घेण्यासाठी आता मुख्यमंत्री शिंदे सरसावले आहेत. भाजप आणि शिंदे हे राज्यात सोबत आहेत, त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेत देखील सत्तेत येऊ इच्छित आहेत. तसेच ठाकरे गटाची मुंबई महापालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता आहे. त्यावरच आधारित राजकारण ठाकरे करतात. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर आता भाजपा तसेच शिंदे गटाने लक्ष केंद्रित केले आहे. 


विस्तारानंतर सुमारे 40 ते 45 माजी नगरसेवक शिंदे गटात?
मुंबईतील प्रत्येक बंडखोर आमदारांवर शिवसेनेच्या चार ते पाच माजी नगरसेवकांना शिंदे गटात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे समजते. तशी व्युहरचना केली जात आहे. शिंदे यांना साथ देणाऱ्या आमदारांमध्ये मुंबईतील पाच आमदार आहेत. त्यात मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव, सदा सरवणकर, दिलीप लांडे या आमदारांचा समावेश आहे. या आमदारांवर आणि मुंबईतील काही पदाधिकाऱ्यांवर शिंदे गटाची मोठी मदार आहे. शिंदे गटात दाखल झालेले खासदार राहुल शेवाळे यांच्यावरही मुंबई महानगरपालिकेची विशेष जबादारी सोपवण्यात येणार आहे, अशी माहिती मिळत आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सुमारे 40 ते 45 माजी नगरसेवक शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे.


शिंदे गटाची व्युहरचना ठरली
शिवसेनेचे माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्यास शिंदे गटाची ताकद वाढणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची मुंबईत ताकद नाही, मात्र ठाकरे गटातील नगरसेवक फुटल्यास ताकद वाढणार आहे. शिवसेनेचे मुंबईतील माजी नगरसेवक फोडल्यास आणि आगामी निवडणुकीत त्यांना बळ दिल्यास त्यांना त्यांच्या जागी पुन्हा निवडून आणणे सोपे होणार आहे. त्यामुळे शिंदे गटात सहभागी असलेल्या आमदार, खासदार आणि मुंबईतील इतर पदाधिकारी यांनी मुंबईतील माजी नगरसेवक आणि इच्छुक यांना आपल्याकडे कसं वळवावं आणि कोणकोणत्या भागात काम करेल याबाबत व्युहरचना शिंदे गट करत असल्याची माहिती आहे.


शिंदे हे देखील ज्येष्ठ शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेत आहेत


ज्येष्ठ नेते आणि शिवसैनिकांची बांधणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे नेते मनोहर जोशी, गजानन कीर्तिकर, रामदास कदम, लिलाधर डाके यांच्या भेटी त्यांनी घेतल्या. शिवसेनेने अडगळीत टाकलेल्या ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ शिवसैनिकांच्या भेटी घेऊन मोर्चेबांधणीला मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरुवात केली आहे. पुढील लढाईत हे ज्येष्ठ नेते आणि शिवसैनिकांची मदत घेऊन ठाकरे गटाला आव्हान देणे शिंदे गटाला सोपे होईल. त्यामुळेच या भेटीगाठी सुरु असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे


मुंबईत हळूहळू पाठिंबा वाढतोय
ठाणे आणि नवी मुंबईतील काही माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत. मुंबईतील माजी नगरसेवकांनी अद्याप कोणतीही हालचाल केली नसली तरी शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये अस्वस्थता आहे अशी चर्चा आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न सुरु असल्याचे समजते. शिवसेनेच्या मुंबईतील माजी नगरसेवक, प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी मुंबईतील कार्यकर्त्यांसह शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. तसेच कालच शिवसेनेच्या ज्येष्ठ मुंबईतील पदाधिकारी संध्या वढावकर आणि ईशान्य मुंबईतील काही कार्यकर्ते शिंदे गटात सहभागी झाले आहेत. अशाचप्रकारे हळूहळू मुंबईतून शिंदे गटाला शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा वाढत आहे. ठाकरे गटासाठी ही धोक्याची घंटा आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.