Petrol & Diesel Price Hike : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसत आहे. मे 2021 सुरु झालेली इंधन दरवाढ  थांबण्याचं नाव घेत नाही. आधीचं कोरोना महामारीमुळे संकटात सापडेल्या सर्वसामान्यांना इंधन दरवाढीमुळे खिशाला फटका बसत आहे.  शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये पुन्हा वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये प्रति लीटर 35 पैशांनी वाढ झाली. दिल्लीमध्ये आज पेट्रोल प्रतिलीटर 108 .64 रुपये झाली आहे. तर डिझेलची किंमत प्रति लीटर 97.37 रुपये इतकी झाली आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलची किंमत प्रति लीटर 114.47 रुपये झाली आहे. तर डिझेलची किंमत 105.49 रुपये झाली आहे.  पुणेकरांना मात्र थोडासा दिलासा मिळाला आहे. goodreturns.in नुसार, पुण्यात आज पेट्रोलच्या दरांत प्रति लीटर 0.13 पैशांनी घसरण झाली आहे. तर डिझेलच्या दरांत प्रति लीटर 0.08 पैशांनी घसरण पाहायला मिळाली. इंधन दरांमध्ये सातत्यानं होणाऱ्या वाढीमुळं पेट्रोल-डिझेलच्या किमतींनीही उच्चांक गाठला आहे. सातत्यानं होणाऱ्या या वाढीमुळं सर्वसामान्यांच्या खिशाला चाप बसत आहे. दरम्यान, स्थानिक करांमुळं प्रत्येक राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती वेगवेगळ्या असतात. 

देशातील महानगरांतील दर काय?  

देशातील महत्त्वाची शहरं पेट्रोल रुपये/लिटर डिझेल रुपये/लिटर
दिल्ली  108 .64 97.37
मुंबई  114.47 105.49
कोलकाता  109.02 100.49
चेन्नई  105.43 101.59

राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती : 

राज्यातील महत्त्वाची शहरं पेट्रोल रुपये/लिटर डिझेल रुपये/लिटर
मुंबई 114.47 105.49
पुणे 114.34 103.73
परभणी 117.13 106.42
औरंगाबाद 115.10 104.47
नागपूर 114.16 103.59

पेट्रोल 150 रुपये लीटर होण्याची शक्यता, डिझेलचाही भडका उडणार 
बाजार अभ्यास आणि क्रेडिट रेटिंग करणारी कंपनी गोल्डमॅन सॅक्स यांच्या अंदाजानुसार पुढील वर्षांपर्यंत ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत 110 डॉलर प्रति बॅरेल पर्यंत जाऊ शकते. ही किंमत सध्याच्या 85 डॉलर प्रति बॅरेलपेक्षा 30 टक्के अधिक आहे. अंदाजानुसार कच्चा तेलाची किंमत 147 डॉलर प्रति बॅरेल या ऑल टाईम हाय लेव्हलपर्यंत जाऊ शकते.  2008 मध्ये ज्यावेळी संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या कचाट्यात आलं होतं तेव्हा कच्चा तेलाची किंमत 147 डॉलर प्रति बॅरेलपर्यंत पोहचली होती. रिपोर्ट्समध्ये असं म्हटलेय की, जर ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत 140 डॉलर प्रति बॅरेलच्या पुढे गेली तर देशातील पेट्रोलची किंमत प्रति लीटर 150 रुपये तर डिझेल प्रति लीटर 140 रुपये इतकं होईल. गोल्डमॅन सॅक्स यांनी पुढील वर्षांपर्यंतचा अंदाज वर्तवला आहे. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).