Petrol Diesel Price Hike : कोरोना महामारीमुळे संकटात असणारे सर्वसामान्य इंधन दरवाढीमुळे हैराण आहेत. काही शहरात पेट्रोल प्रतिलीटर 120 रुपयांच्या जवळ पोहचलं आहे तर डिझेलही प्रतिलीटर 100 रुपयांच्या पुढे गेलं आहे. मे 2021 पासून वाढणारे पेट्रोल-डिझेल यापुढेही काही दिवस वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पेट्रोलची किंमत प्रतिलीटर 150 रुपयांपर्यंत तर डिझेलची किंमत 140 रुपये होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 
 
बाजार अभ्यास आणि क्रेडिट रेटिंग करणारी कंपनी गोल्डमॅन सॅक्स यांच्या अंदाजानुसार पुढील वर्षांपर्यंत ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत 110 डॉलर प्रति बॅरेल पर्यंत जाऊ शकते. ही किंमत सध्याच्या 85 डॉलर प्रति बॅरेलपेक्षा 30 टक्के अधिक आहे. अंदाजानुसार कच्चा तेलाची किंमत 147 डॉलर प्रति बॅरेल या ऑल टाईम हाय लेव्हलपर्यंत जाऊ शकते.  2008 मध्ये ज्यावेळी संपूर्ण जग आर्थिक मंदीच्या कचाट्यात आलं होतं तेव्हा कच्चा तेलाची किंमत 147 डॉलर प्रति बॅरेलपर्यंत पोहचली होती. रिपोर्ट्समध्ये असं म्हटलेय की, जर ब्रेंट कच्च्या तेलाची किंमत 140 डॉलर प्रति बॅरेलच्या पुढे गेली तर देशातील पेट्रोलची किंमत प्रति लीटर 150 रुपये तर डिझेल प्रति लीटर 140 रुपये इतकं होईल. गोल्डमॅन सॅक्स यांनी पुढील वर्षांपर्यंतचा अंदाज वर्तवला आहे. पेट्रोल-डिझेलचे दर नियंत्रणात येण्याची शक्यता कमीच वाटत आहे. कारण आधीच पेट्रोल आणि डिझेलला जीएसटी कक्षेत आणण्याला विरोध होत आहे. तसेच सरकारकडून यावरील करांमध्येही कोणतीही कपात केलेली दिसत नाही. याचा सर्व बोजा सर्वसामान्य जनतेवर पडत आहे. 


गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्यानं वाढ होत आहे.  शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये पुन्हा वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये प्रति लीटर 35 पैशांनी वाढ झाली. दिल्लीमध्ये आज पेट्रोल प्रतिलीटर 108 .64 रुपये झाली आहे. तर डिझेलची किंमत प्रति लीटर 97.37 रुपये इतकी झाली आहे. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलची किंमत प्रति लीटर 114.47 रुपये झाली आहे. तर डिझेलची किंमत 105.49 रुपये झाली आहे.