मुंबई : मराठा आरक्षणावरची अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला असल्याची माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यानी दिली आहे. मराठा आरक्षण संदर्भात आज मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा येथे बैठक पार पडली. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याआधी अशोक चव्हाण यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
अशोक चव्हाण म्हणाले, की अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने आज सुप्रीम कोर्टाने अर्ज दाखल केलेला आहे. स्थगिती निरस्त (vacate) करण्यासाठी अर्ज दाखल करणं ही प्रक्रिया आहे. यावर पुढे सुनावणी होईल. आज एक टप्पा पुढे गेलो आहोत. उद्या किंवा परवा मुख्यमंत्री याबाबत भूमिका मांडतील.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे दोन्ही नेत्यांची भेट झाली. मराठा आरक्षण स्थगितीनंतर पुढील रणनीती ठरवण्यासाठी या नेत्यांमध्ये चर्चा झाली.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही बैठकीला उपस्थित होते. मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागावा यासाठी आधीही प्रयत्नशील होतो, आजही आहोत, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर दिली. ते म्हणाले, की स्थगिती उठण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, त्याची माहिती पवारांना दिली त्यांचाशी चर्चा केली. त्यांनीही आपली मतं मांडली. सर्वोच्च न्यायालयात जायचं आहे त्याची तयारी सुरू आहे, त्याबाबत शरद पवारांशी चर्चा केली. कायदेशीर मुद्दे आहेत, त्याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली होती, त्याची माहिती शरद पवारांना दिली. आपण न्यायालयात जातो आहेच, घटनापीठ लवकर स्थापन व्हावं यासाठी आपण मुख्य न्यायमूर्तींकडे प्रयत्न करतोय.
भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट करावं कोणत्या नेत्यांना आरक्षण नको आहे, असे आव्हानही अशोक चव्हाण यांनी केलं आहे. दरम्यान, लोकल सेवा सुरू करायच्या की बंद ठेवायच्या याचा निर्णय परिस्थितीचा विचार करून घेतला जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
शेतकरी हितासाठी काँग्रेस लढत आहे, तिथे सगळ्यांनी एकत्र येऊन शेतकर्यांचे हात मजबूत केले पाहिजेत. शेतकऱ्यांची गळचेपी होतेय, मध्यस्थांचा फायदा होतोय, याला काँग्रेसचा विरोधच आहे. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीने सभात्याग का केला ते त्यांनाच विचारा. राज्यात आम्ही एकत्र आहोत, केंद्रांतही एकत्र असायला हवं होतं, असंही ते म्हणाले.
Maratha Reservation | मराठा आरक्षण मार्गी लागावं यासाठी आधीही प्रयत्नशील होतो,आजही आहोत: अशोक चव्हाण