कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण दिलं तर आपल्या नावापुढे बॅकवर्ड लागेल अशी भीती मराठा समाजातील बड्या नेत्यांना आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर नाव न घेता केली आहे. आज कोल्हपुरात पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. शिवाय या मुद्द्यावर राज्यात भारतीय जनता पार्टी आक्रमक होईल, असंही दादा म्हणाले.



मराठा समाजाचे नेते म्हणवून घेणाऱ्यांकडे एक दोन नाही तर सलग 15 वर्षे सत्ता होती. त्याच्या आधी देखील कित्येक वर्षे सत्ता होती. मात्र त्यावेळी देखील कधी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. मराठा समाजाला आरक्षण दिलं तर त्यांची मुलं शिकतील, मोठी होतील. चांगल्या ठिकाणी नोकरीला लागतील. समाजाचा विकास होईल. पण समाजाचा विकास झाला तर मग आपल्या मागे कोण फिरतील. यांचं राजकारण चालण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही, असा घणाघाती आरोप चंद्रकांतदादा पाटील यांनी केलाय.

बॅकवर्ड फॉरवर्ड ठेवा बाजूला


मराठा समाजातील श्रीमंत असलेल्या नागरिकांना आरक्षण नको आहे. त्यांना गरीब हा गरीबचं राहिला पाहिजे असं वाटतं. बहुतांश नेत्यांना आपला समाज पुढे यायला नको असं वाटतं. जर ते पुढे आले तर आपल्या मागे कोण फिरणार असा त्यांना प्रश्न पडतो. समाजाला गरीब ठेवायचं म्हणजे ते सांगतील त्याठिकाणी मतदान करुन घेतात, अशी टीका देखील चंद्रकांत पाटलांनी आज कोल्हापुरात बोलताना केली.


प्रकाश आंबेडकर यांच्या मताशी सहमत


प्रकाश आंबेडकरांनी टीका केली की, मराठा समाजातील श्रीमंतांनी गरीब मराठा समाजाला पुढे आणलं नाही. त्यांच्या मताशी मी सहमत आहे. कारण श्रीमंत असलेल्या मराठा नागरिकांना आपल्या नावापुढे बॅकवर्ड हा शब्द नको आहे. आम्ही फॉरवर्डच असल्याचं ते मानतात, असंही वक्तव्य आज चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.