पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे लीगल जस्टीस सोसायटीच्या वतीने खासगी खटला दाखल करण्यात आला आहे. अॅड. भक्ती राजेंद्र पांढरे (वय 24) यांनी लष्कर न्यायालयात हा खटला दाखल केला आहे.


पूजा चव्हाण यांचा मृत्यू संशयास्पद असून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास आरोपीद्वारा यातील पुरावे नष्ट करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करावी आणि तपास करावा यासाठी न्यायालयाचे आदेश आवश्यक असल्याचे याद्वारे भक्ती पांढरे यांनी न्यायालयामोर मांडले.


7 फेब्रुवारीच्या रात्री पूजा चव्हाण हिचा वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका इमारतीवरून पडल्याने मृत्यू झाला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर संशय व्यक्त केला जातोय. भाजपच्या नेत्यांवर संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येतेय. पुणे पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या भारतीय जनता पक्षाने या प्रकरणावरून आक्रमक रूप धारण केले आहे.


भाजपच्या नेता चित्रा वाघ यांनी काल वानवडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस अधिकारी दीपक लगड यांना धारेवर धरले. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून काढून थेट एखाद्या एखाद्या सक्षम आयपीएस अधिकाऱ्याकडून या प्रकरणाचा तपास करण्यात यावा अशी मागणी केली. चित्रा वाघ यांनी अमिताभ गुप्ता यांची भेट घेत पोलिसांनी आतापर्यंत नेमका तपास काय केला त्याची विचारणा केली.


दरम्यान संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी भाजपच्या पुणे शहर उपाध्यक्ष स्वरदा बापट यांनी वानवडी पोलिसात तक्रार अर्ज दिला आहे. याप्रकरणी अद्याप दाखल करण्यात आला नाही. त्यानंतर आज अॅड. भक्ती राजेंद्र पांढरे (वय 24) यांनी याप्रकरणी लष्कर न्यायालयात हा खटला दाखल केला आहे.