वसई : व्हॉट्सअॅपवर आपले किंवा आपल्या जवळच्या लोकांचे सुंदर फोटो ठेवत असाल तर यापुढे थोडं सावध राहिलं पाहिजे. कारण नालासोपारा पूर्वेडील तुळींज पोलिसांनी एका माथेफिरु कॉलेज तरुणाला अटक केली आहे. अटक केलेला तरुण सुंदर मुलींचे व्हॉट्सअॅपवरील फोटो घेवून, ते फोटो एडिट करून त्याचे अश्लील फोटो बनवत होता. त्यानंतर ते फोटो समाजमाध्यमात पसरवण्याची धमकी देवून, पैशाची मागणी ही करत होता. अखेर पोलिसांनी मोठ्या शिताफीने या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
अनिकेत शेलार असं अटक केलेल्या 20 वर्षीय तरुणाचं नाव आहे. या महाशयाने आपल्याला नोकरीसाठी पैसे द्यावे लागतील, त्यासाठी आगोदरच तजवीज करुन ठेवण्यासाठी लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याचा मार्ग निवडला. त्यासाठी त्याने व्हॉट्सअॅपवरील सुंदर मुलींचे फोटो स्क्रीनशॉट मारुन आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केले होते. त्यानंतर त्याने त्या फोटोचे अश्लील फोटोत एडीटिंग केलं आणि त्या मुलींना त्यांचे असे अश्लील फोटो सोशलमीडियावर प्रसारीत करुन बदनामीची धमकी देत होता.
फोटो सोशलमीडियावर व्हायरल न करण्याच्या बदल्यात तो त्यांच्याकडून दहा ते वीस हजार रुपये रक्कमेची मागणी करत होता. पडगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन मुलींना अशाप्रकारे तो ब्लॅकमेल करत होता. त्या मुलींनी पडघा पोलीस ठाण्यात याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला होता. तर तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतही एका मुलीला अशाप्रकारे तो ब्लॅकमेल करत असताना, पालघर पोलिसांच्या सायबर सेलच्या मदतीने आरोपी अनिकेतच्या मुसक्या आवळल्या.
आरोपी अनिकेत शेलार हा मुंबईच्या कॉलेजमध्ये कॉमर्स शाखेत दुसऱ्या वर्षात शिकत आहे. त्यांने एअर इंडिआमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता. एअर इंडिआमध्ये नोकरीसाठी पैसे मोजावे लागतील अशी त्याची खोटी समज झाली होती. त्यासाठीच पैसे जमा करण्यासाठी त्याने हा मार्ग अवलंबला होता. व्हॉट्सअप फोटो ठेवतांना थोडं सावध असावं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.