पालघर : प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या रॅगिंगप्रकरणी पालघर पोलिसांत एम एल ढवळे रुग्णालयातील 15 वरिष्ठ डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानसिक इजा पोहोचवल्याप्रकरणी पालघर पोलिस ठाण्यात या महिला डॉक्टरने शुक्रवारी (15 नोव्हेंबर) तक्रार नोंदवली. या 15 वरिष्ठ डॉक्टरांविरोधात महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा कलम 4 अन्वये गुन्ह्याची नोंद झाली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

ही प्रशिक्षणार्थी डॉक्टर ढवळे रुग्णालयात आपले शिक्षण पूर्ण करुन प्रशिक्षणासाठी म्हणून दोन-तीन दिवसांपूर्वी रुजू झाली होती. इथे प्रशिक्षण घेत असताना वरिष्ठांसोबत ओळख करुन घेत असताना, त्यांनी गुरुवारी (14 नोव्हेंबर) रात्री छळ केला. यामुळे मानसिक इजा पोहोचल्याचा आरोप या डॉक्टरने केला आहे. तिने शुक्रवारी पालघर पोलिस स्टेशन गाठून सर्व वरिष्ठ डॉक्टरांविरोधात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरुन 15 डॉक्टरांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहणारे ढवळे रुग्णालय आता या रॅगिंग प्रकरणामुळे चर्चेत आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने रॅगिंगविरोधात कडक कायदे केल्यानंतरही संबंधित प्रकार सुरु आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.