मुंबई : "बॉलिवूडशी नातं सांगणारे वांद्रे पूर्वला राहतात," अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी नाव न घेता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच गुंड प्रवृत्तीचे लोक सत्तेत असल्याचा घणाघातही त्यांनी केला. एबीपी माझाच्या "प्रश्न महाराष्ट्राचे... उत्तरं नेत्यांची" या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.


अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात विरोधकांकडून आदित्य ठाकरे यांच्याकडे वारंवार अंगुलीनिर्देश केला जात आहे. यानंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रक जारी करुन आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. त्यातच आता बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहेत. शिवाय बहुतांश सेलिब्रिटी वांद्रे भागात राहतात. या अनुषंगाने प्रश्न विचारला असता आशिष शेलार म्हणाले की, "वांद्रे पश्चिम हा बदनाम मतदारसंघ नसून अनेक प्रामाणिक मतदार तिथे राहतात. बॉलिवूडची लोक तिथे राहतात. मी बॉलिवूडच्या स्वत: पार्ट्यांना जातो असं परिपत्रक हे लोक काढत नाहीत. बॉलिवूडशी संबंध आहेत, असं पत्रक काढणारे वांद्रे पूर्वला राहतात."


काही दिवसांपूर्वी मुंबई उपनगरातील कांदिवली इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं व्यंगचित्र फॉरवर्ड केल्याप्रकरणी काही शिवसैनिकांनी एका निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली होती. या मुद्द्यावरही आशिष शेलार यांनी शिवसेनेवर घणाघात केला आहे. गुंड प्रवृत्तीचे लोक सरकारमध्ये असल्याचा असं शेलार म्हणाले.


घराबाहेर पडण्याबाबत विचारलं तर मुख्यमंत्र्यांना राग येतो
राज्यात कोरोनाचं संकट असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडत नाही, असा आरोप विरोधकांकडून वारंवार होत आहे. याबाबत विचारलं तर त्यांना राग येतो, असं आशिष शेलार म्हणाले. पूरग्रस्त भागात विरोधक पोहोचले, मुख्यमंत्री गेले नाहीत. कोणत्याही कोविड सेंटरमध्ये विरोधी पक्षनेते पोहोचले, मुख्यमंत्री नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचतोय असं सांगणार आणि प्रत्यक्षात जाणार नाही. प्रश्न विचारले तर राग येतो. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, राजेश टोपे राज्यात फिरत आहेत. ते काय चुकीचं काम करत आहेत का? तुम्ही तुमची तब्येत जरुर सांभाळा, पण १२ कोटी जनताही तेवढीच महत्त्वाची आहे, असं आशिष शेलार म्हणाले.


तर भाजपच्या आरोपांना उत्तर देताना शिवसेनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उदाहरण दिलं जातं. पंतप्रधानही घराबाहेर न पडता संपूर्ण गोष्टींचा आढावा घेतात, असं शिवसेनेकडून सांगण्याच येतं. यावर आशिष शेलार म्हणाले की, "पंतप्रधान 90 टक्के ई-मेलला रिप्लाय करतात. दर महिन्याला 'मन की बात' करतात. पंतप्रधानांना प्रश्न विचारला तर राग येत नाही, मुख्यमंत्र्यांना राग का येते, कार्यकर्त्यांना राग का येतो, त्यांनी उत्तर द्यावी. भावनांचं राजकारण करुन विषयांतर का करावं, तोंड लपवण्याचं काम का करावं?"