मुंबई : "मुंबईचं महत्त्व कमी केलं जात आहे. महाराष्ट्राला, मुंबई पोलिसांना ठरवून बदनाम केलं जात आहे. मुंबईची आर्थिक ताकद कमी केली जात आहे. मुंबईतील प्रमुख संस्था बाहेरच्या राज्यात नेल्या जात आहेत. शिवसेना आहे म्हणून मुंबई महाराष्ट्राची आहे," असं शिवसेना खासदार संजय राऊत राज्यात सुरु असलेल्या परिस्थितीवर म्हणाले. एबीपी माझाच्या "प्रश्न महाराष्ट्राचे... उत्तरं नेत्यांची" या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.


महाराष्ट्रात प्रश्नांचा डोंगर आहे. कोविडचं संकट जगभरात आहेच, महाराष्ट्रात ते संकट जास्त आहे. कोविडचं संकट अद्याप संपलेलं नाही. वर्षभर तरी हे संकट संपणार नाही. या निमित्ताने महाराष्ट्राची आर्थित स्थिती ढासळली आहे आणि केंद्र सरकार मदत करायला तयार नाही. लोक बेरोजगार झाले आहेत. हा प्रश्न पुढील अराजकतेला जन्म देईल. त्यातून निर्माण होणारा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होईल, असं संजय राऊत म्हणाले.


शिवसेना आहे म्हणून मुंबई महाराष्ट्रापासून तुटलेली नाही!
संजय राऊत म्हणाले की, "शिवसेना आहे म्हणून मुंबई महाराष्ट्रापासून तुटलेली नाही. आम्ही सगळे एकत्र आहोत म्हणून मुंबई महाराष्ट्राची आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील प्रमुख संस्था बाहेर नेल्या जात आहेत. मुंबईचं महत्त्व कमी केलं जात आहे.मुंबईची आर्थिक ताकद कमी करुन मुंबई पंख छाटले जात आहेत."


अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईची पाकव्यात काश्मीरशी तुलना केली. त्यातच मुंबई महापालिकाने तिच्या कार्यालयात अनधिकृत बांधकाम असल्याचं दावा करत कारवाई केली होती. यावर संजय राऊत म्हणाले की, "मुंबईत राहायचं, मुंबईची बदनामी करायची, मुख्यमंत्र्यांना अरे-तुरेची भाषा करायचा आणि आपण बेकायदेशीर महालात राहायचं. महापालिका स्वायत्ता संस्था आहे. त्यांना काही अधिकार आहेत. जर त्यांनी अनधिकृत बांधकामं केली असतील तर त्याचं स्वागत करायला हवं."


मराठा समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात हे माझं मत
"प्रत्येक सत्ताधारी पक्ष मराठा आरक्षणासाठी काम करत आहे. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली महत्त्वाची समिती काम करत आहे. मुख्यमंत्र्यांचं त्यावर लक्ष आहे. मी या विषयावर जाहीर बोलणार नाही, तो माझा अधिकार नाही. एकनाथ शिंदे समितीत आहे, शरद पवार दिल्लीत यावर बोलले आहे. वाद निर्माण होईल असं कोणतंही वक्तव्य करणार नाही. बहुजन समाजाचा मोठा घटक असलेल्या मराठा समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात या मताचा मी आहे आणि त्यासाठी सरकार जे जे शक्य आहे ते करत आहे," असं संजय राऊत यांनी सांगितलं.