मुंबई : गेल्या काही दिवसात बॉलिवूड कलाकार सुशांत सिंग राजपूत यांची आत्महत्या चर्चेत राहिली आहे. सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या ही आत्महत्या आहे की हत्या? नेमकं अस काय झालं की सुशांत सिंग राजपूतला इतकं टोकाचं पाऊल उचलावे लागले? बॉलिवूडमधील राजकारण यामागे आहे का? यावरून चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी आज मंत्रालयात गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली.

Continues below advertisement

पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना याबाबतचं पत्र दिलं. या पत्रात पार्थ यांनी सुशांत सिंग प्रकरणी उत्तर प्रदेश, बिहार सारख्या राज्यातून अनेक तरुणांचे फोन आले. या प्रकरणात आपण काही तरी करावे. सुशांतच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती पार्थ पवार यांनी केली. तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणीही केली आहे.

पार्थ पवार यांनी हे पत्र लिहिल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली की गृहखाते हे राष्ट्रवादीकडे आहे. गृहमंत्री देखील राष्ट्रवादीचे आहेत. असं असून देखील पार्थ पवार यांनी सीबीआयकडे चौकशी करण्याची मागणी केली. मुंबई पोलिसांवर विश्वास नाही का? अशीही चर्चा यानिमित्ताने सुरू झाली.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; रिया चक्रवर्तीची अमित शाहांकडे सीबीआय चौकशीची मागणी

एकीकडे सुशांत सिंग राजपूत आत्महत्ये प्रकरणी गरज पडल्यास करण जोहरची चौकशी करू, असं वक्तव्य गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते. आज महेश भट्ट यांनी देखील पोलिसात या प्रकरणी आपला जबाब नोंदवला आणि आजच पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केल्याने चर्चा सुरू झाली आहे.

बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड यांचे संबंध, बॉलिवूड मधील घराणेशाही, बाहेरून येणाऱ्यांची स्ट्रगल. नुकताच ऑस्कर विजेते ए. आर.रहमानने देखील बॉलिवूडमधील लॉबीबाबत वक्तव्य केले होते. या आणि अशा कारणांमुळे बॉलिवूड नेहमी वागग्रस्त ठरले आहे. आता राजकीय नेत्यांनी सीबीआय चौकशी मागणी केल्याने सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला राजकारणाची एक वेगळीच किनार लागली आहे.

संबंधित बातम्या