Mumbai News Updates: मुंबईत (Mumbai News) अमराठी शाकाहारी लॉबीची मुजोरी मोडीत निघणार का? हा प्रश्न सध्या मुंबईभरात चर्चेत आहे. कदाचित आता या मुजोरीला वेसण घातलं जाण्याची शक्यता आहे. मुंबईत मराठी माणसाला (Marathi People) घरखरेदीत 50 टक्के आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. 'पार्ले पंचम' (Parle Pancham) सामाजिक संस्थेनं मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली असून आता मुख्यमंत्री या मागणीला प्रतिसाद देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काही दिवसांपासून अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये काही उच्चभ्रू इमारतींमध्ये आणि विशिष्ट समुदायांच्या इमारतींमध्ये घर घेण्यास किंवा घर भाड्यानं देण्यास परवानगी नाकारली जात आहे. त्यासाठी प्रामुख्यानं मराठी माणूस मांसाहार करतो, असं कारण दिलं जात असल्याचं समोर येत आहे. अनेक ठिकाणी तर उच्चभ्रू इमारतींमध्ये अट घातली जाते आणि अशा इमारतींमध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तींना प्रवेशच नाकारला जातो. तसेच, इमारतींमधील रिसेल प्लॅट असतात, ते विकताना इमारतीतील विशिष्ट समुदायातील लोकं घरमालकाला कोणाला हा प्लॅट विकला जावा अशी अटही घालतात. यामुळे मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण झाला आहे.
मुंबईत मराठी माणसाला घरखरेदीत 50 टक्के आरक्षण द्या, पार्ले पंचम संस्थेची मागणी
मुंबईतील सामाजिक संस्था पार्ले पंचमनं याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेत मागणी केली आहे. ज्यावेळी नवी इमारत बांधली जाईल आणि ज्यावेळी त्या इमारतीची बुकिंग सुरू होईल, तेव्हापासून वर्षभरापर्यंत त्या इमारतीतील 50 टक्के घरं मराठी माणसांसाठी आरक्षित केली गेली पाहिजेत. जर एक वर्षानंतर ही घरं विकली गेली नाहीत, तर मात्र बिल्डर्सना ते प्लॅट्स इतर कोणालाही विकण्याची परवानगी दिली जावी, अशी मागणी पार्ले पंचमनं केली आहे.
नव्यानं बांधण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये अट घालण्यात यावी, सामाजिक संस्थेची मागणी
मराठी माणसांसाठीची आरक्षणाची अट नव्यानं बांधण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये घालण्यात यावी, अशी मागणी पार्ले पंचमची आहे. यामुळे केवळ मांसाहार करतात म्हणून मराठी व्यक्तींना फ्लॅट विकला जात नाही, असे प्रकार पुन्हा होणार नाहीत. तसेच असा नियमच करावा अशी मागणीही सामाजिक संस्था पार्ले पंचम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज ठाकरेंकडेही करण्यात आली आहे. तसेच, यासाठी एक चळवळ उभी करणार असल्याचंही पार्ले पंचमचं म्हणणं आहे.