मुंबई: आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी आल्याची तक्रार केली आहे. चेन्नईत ड्यूटीवर असताना बांगलादेशी धार्मिक कट्टरपंथीयांकडून कॉल आणि मेसेजद्वारे धमकी आल्याचा दावा वानखेडे यांनी केला आहे. तसा ई-मेल त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि गोरेगाव पोलीस ठाण्याला पाठवला आहे. याबाबत अजून तक्रार दाखल झाली नसून याचा प्राथमिक तपास गोरेगाव पोलीस करत आहेत.


Sameer Wankhede On Underworld Threat : मी अंडरवर्ल्डला घाबरत नाही


एनसीबी मुंबई माझी झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी गुप्ते तिथे खुपते या झी मराठीच्या कार्यक्रमात मुलाखत देताना आपण अंडरवर्ल्डला घाबरत नसल्याचं म्हटलं होतं. कुणी देशाबाहेरून मला धमकी देत असेल तर मी त्याला घाबरत नाही, त्यांच्यात धमक असेल तर त्यांनी माझ्यासमोर यावं आणि चर्चा करावी असं वक्तव्यही त्यांनी केलं होतं. समीर वानखेडे म्हणाले होते की, "अंडरवर्ल्डचे गुन्हेगार हे आमच्यासाठी खूप छोटे गुन्हेगार आहेत. त्यांची नावे घेऊन त्यांना प्रसिद्धी द्यायची आणि त्यांना महत्त्व द्यायचं नाही. अंडरवर्ल्डच्या अशा धमक्यांनी मी घाबरत नाही. मी त्यांना आव्हान देतो. परदेशात बसून त्यांनी मला धमक्या देऊ नयेत. हिंमत असेल तर त्यांनी माझ्यासमोर येऊन माझ्याशी बोलावे."


आर्यन खान प्रकरण काय आहे? (What Is Aryan Khan Cruise Drugs Case)


समीर वानखेडे हे आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी चर्चेत आले होते. एनसीबीनं 2 ऑक्टोबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी पाच ग्रॅम मेफ्रेडॉन, 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजारांची रोकड जप्त केली होती. यावेळी एनसीबीनं या क्रूझवरून आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं.


एनसीबीनं याप्रकरणी आर्यन खानसह अन्य आरोपींविरोधात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती. त्यानंतर याप्रकरणी आर्यन खानची निर्दोष सुटका झाली. दरम्यान समीर वानखेडे यांच्या तपास प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. भ्रष्टाचारासह त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. त्या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल करत त्यांची चौकशी सुरू केली आहे. 


ही बातमी वाचा: