मुंबई : माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना बुधवारी मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने फरार घोषित केलं आहे. परमबीर सिंह यांना फरार घोषित केल्यानंतर आता त्यांना 30 दिवसांची मुदत दिली जाणार आहे. या 30 दिवसात परमबीर सिंह जर न्यायालयासमोर हजर झाले नाहीत तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार आहे. परमबीर सिंह यांना फरार घोषित केल्यानंतर आता त्यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे.
परमबीर सिंहांच्या पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रातल्या स्थावर मालमत्तेची यादी सरकारकडे नोंद आहे. येत्या 30 दिवसात जर परमबीर सिंह तपास यंत्राणांच्या समोर हजर झाले नाहीत तर त्याच्या संपत्तीवर जप्ती आणण्याची तयारी क्राईम ब्रँचकडून करण्यात येणार आहे.
परमबीर सिंह यांच्या स्थावर मालमत्तेची माहिती
1. हरियाणामधील फरिदाबाद या ठिकाणी एक शेतजमीन. या शेतजमिनीची किंमत 1997 साली 22 लाख रुपये इतकी होती. या जमिनीचे मालक स्वत: परमबीर सिंह आहेत. आपल्या डिक्लेरेशनमध्ये त्यांनी स्वत: सांगितलं आहे की त्यांना या जमिनीतून दरवर्षी 51 हजार रुपये मिळतात.
2. मुंबईच्या जुहू परिसरात एक फ्लॅट आहे. तो त्यांनी 2003 साली 48.75 लाख रुपयांना खरेदी केला होता. आज त्याची किंमत जवळपास 4.64 कोटी रुपये इतकी आहे. या संपत्तीमधून त्यांना दरवर्षी 24 लाख 95 हजार रुपये मिळतात.
3. नवी मुंबईमधील नेरुळ परिसरात त्यांचा एक फ्लॅट आहे. त्याची खरेदी 2005 साली तीन कोटी 60 लाख 30 हजार रुपयांना केली होती. या संपत्तीत त्यांची पत्नी सविता सिंह यांचा शेअर असून त्यांना वर्षाला यातून 9.60 लाख रुपये मिळतात.
4. चंदीगडमध्ये 4 कोटी रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये त्यांच्या दोन भावांचाही वाटा आहे.
5. हरियाणामध्ये फरिदाबाद या ठिकाणी त्यांची एक जमीन आहे. या जमिनीची खरेदी 2019 साली 14 लाख रुपयांना करण्यात आली होती. ती एकूण 400.382 स्क्वेअर यार्ड इतकी आहे. ही संपत्ती परमबीर सिंह यांच्या नावावर आहे.
परमबीर सिंह यांना फरार घोषित केल्यानंतर येत्या 30 दिवसात ते तपास यंत्रणांच्या समोर आले नाहीत तर त्यांच्या या संपत्तीवर टाच आणलं जाणार आहे. त्यांच्या मुंबईतील घरावर त्यांना 30 दिवसांत हजर राहण्याची नोटिस देण्यात आली आहे.
खंडणीच्या गुन्ह्यात आत्तापर्यंत केलेल्या तपासानुसार आरोपी असलेले परमबीर सिंह हे फरार झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे त्यांना फरार आरोपी घोषित करण्यात यावं, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतर्फे विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केला होता. परमबीर सिंह यांच्या व्यतिरिक्त रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू या इतर दोन आरोपींनाही फरार घोषित करण्याचे आदेश देण्याची मागणी अर्जातून कोर्टाकडे करण्यात आली होती. अजामीनपात्र वॉरंट जारी करूनही आरोपी अद्याप तपासयंत्रणेसमोर आलेले नाहीत. ते बेपत्ता असल्याचं तपासातून निष्पन्न झालेलं आहे. या आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 384, 385, 388, 389, 120 (ब) आणि 34 अन्वये गुन्हा नोंदवलेला आहे.
संबंधित बातम्या :