Parambir Singh : मुंबईत दाखल झाल्यानंतर चौकशीसाठी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात हजेरी लावणाऱ्या परमबीर सिंह (Parambir Singh)यांना आता सीआयडी (CID) चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती आहे. येत्या सोमवारी आणि मंगळवारी सीआयडी परमबीर सिंह यांची चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

सीआयडीकडून दोन गुन्ह्यात परमबीर सिंग यांना समन्स बजावलं असल्याची माहिती सूत्रांची माहिती आहे. सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवशी चौकशीला हजर राहण्याचं समन्स त्यांना पाठवलं आहे. मरीन ड्राईव्हमधील श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार दाखल झालेल्या गुन्ह्यात त्यांना समन्स देऊन चौकशीला सोमवारी बोलावण्यात आलंय. ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात परमबीर सिंग यांना मंगळवारी हजर राहण्यासाठी समन्स देण्यात आलं असल्याची माहिती आहे. ठाण्यातील बाजारपेठ पोलीस ठाण्यातून सीआयडीला वर्ग झालेल्या भीमराव घाडगे यांच्या तक्रारीचा अट्रोसिटीच्या गुन्ह्यात परमबीर यांचा जून महिन्यात जबाब सीआयडीने नोंदवला आहे. अट्रोसिटी गुन्ह्यात चंदीगढला जाऊन परमबीर यांचा जबाब सीआयडीकडून नोंदवण्यात आला असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे. 
 

परमबीर सिंह मुंबईत दाखल होताच चौकशीचा ससेमिरा सुरू झाला आहे. कांदिवलीमध्ये सात तास चौकशी झाल्यानंतर परमबीर सिंह ठाण्याच्या ठाणे नगर पोलिस स्टेशन मध्ये चौकशीसाठी हजर झाले. ठाणे नगर पोलिस स्टेशन मध्ये त्यांच्यावर खंडणी उकळल्याचा आरोप आहे तर सोमवारी चांदीवाल आयोगासमोर परंबिर सिंह यांना हजर राहायचं आहे. 

Parambir Singh Exclusive : परमबीरांचे पाय खोलात; गृहमंत्रालयातील गोपनीय फाईल निकटवर्तीय संजय पुनामिया यांच्या मोबाईलमध्ये

गेल्या दोन महिन्यांत पेक्षाही अधिक काळ बेपत्ता असलेले आणि फरार घोषित करण्यात आलेले परमबीर सिंह मुंबई विमानतळावर उतरले आणि थेट कांदिवली गुन्हे शाखेचे कार्यालय पोहोचले. दुसरा दिवस उजाडला आणि परमबीर सिंह ठाणे नगर पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले.

ठाण्यामध्ये परमबीर यांच्यावर एकूण 3 गुन्हे 

खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन परमबीर यांच्यासह पराग मणेरे, संजय पुनमिया, सुनील जैन यांनी खंडणी घेतल्याचा शरद अग्रवाल यांचा आरोप आहे. याप्रकरणी कोपरी पोलिसात गुन्हा दाखल आहे.

परमबीर यांच्या इशाऱ्यावरुनच एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी धमक्या देऊन आपल्याकडून साडेतीन कोटी रुपये खंडणी वसूल केल्याचा केतन तन्ना, सोनू जालान, रियाज भाटीचा आरोप आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलिसात गुन्हा दाखल आहे.

पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांच्याकडून एससी, एसटी एक्ट अंतर्गत परमबीर सिंह यांच्याविरोधात कल्याण येथील बाजारपेठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :