मुंबई : ऑपरेशन चेक शर्ट्स अंतर्गत माहितीचे विश्लेषण करून महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) भारताबाहेर परकीय चलनाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन प्रवाशांची माहिती मिळवली. या माहितीच्या आधारे शुक्रवारी पहाटेच्या वेळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले.
अटक केलेल हे दोघेजण शारजाहला जाण्याच्या तयारीत होते. त्यांच्या बॅगची तपासणी केल्यावर त्यामध्ये 3.7 कोटी डॉलर मूल्याचे अमेरिकी डॉलर्स आणि सौदी दिऱ्हाम्स सापडले. हे परकीय चलन बॅगेच्या तळाशी तयार केलेल्या छुप्या पोकळ्यांमध्ये अतिशय शिताफीने लपवलेले होते. सामानाचे सामान्य पद्धतीने केलेल्या स्कॅनिंगमध्ये हे चलन सापडणार नाही अशा प्रकारे बॅगेच्या तळाशी ते चलन लपवण्यासाठी विशिष्ट प्रकारची रचना करण्यात आली होती. या दोन्ही प्रवाशांकडे या अवैध चलनासंदर्भात किंवा चलनाची कायदेशीर पद्धतीने निर्यात दर्शवणारी कोणतीही कागदपत्रे नव्हती.
या प्रवाशांकडून सीमाशुल्क कायदा 1962 च्या कलम 110 अंतर्गत हे परकीय चलन हस्तगत करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. सीमाशुल्क कायद्यानुसार तस्करी व्यतिरिक्त परकीय चलनाची बेकायदेशीर निर्यात अवैध आणि गुन्हेगारी कारवायांना पाठबळ देणारे साधन मानले जाते. त्या शिवाय यामुळे देशाची अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होतो.
परकीय चलन, सोने, अंमली पदार्थ आणि इतर प्रकारचे मादक पदार्थ यांच्या भारतात आणि भारताबाहेर होणाऱ्या तस्करीला आळा घालण्यासाठी डीआरआय अतिशय दक्ष राहून प्रयत्न करत असते. गेल्या दीड महिन्यात आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मोठ्या प्रमाणावर परकीय चलन हस्तगत करण्याची ही चौथी घटना आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे 99 टक्के स्थलांतरण पूर्ण; 1 जानेवारीपासून कामाला सुरुवात होणार
- Mumbai Airport : मुंबई विमानतळावर आज सकाळी प्रवाशांची मोठी गर्दी! ढिसाळ कारभारामुळं फ्लाइट्स हुकल्याचा आरोप
- मुंबई विमानतळावर 'अदानी एअरपोर्ट' फलकाची शिवसेनेकडून तोडफोड; तोडफोडीनंतर अदानी समूहाकडून स्पष्टीकरण