मुंबई : भाजपने विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad Election) पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. यात भाजपाने पंकजा मुंडेंसह (Pankaja Munde) तीन ओबीसी नेत्यांना संधी दिली आहे. पंकजा मुंडेंना विधानपरिषदेत संधी मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. आज पंकजा मुंडे आपला उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत. त्याआधी पंकजा मुंडेंनी मुंबईतील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्या वरळीत दाखल झाल्या. माध्यमांशी संवाद साधताना त्या भावूक झाल्याचे दिसून आले.  


नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?


पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी आजच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक करत आहे. चांगल्या वाईट काळात मला संधी दिली आहे.  जेपी नड्डा, अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे, या सगळ्यांचे आभार मानते. मला प्रतीक्षा करावी लागली, आज लोकांना हवं ते झालं आहे. मला आज जे काही मिळतंय ते पाच जीवांच्या चरणी अर्पण करते. आज ते इकडे असते तर घोषणा दिल्या असत्या. त्यांना मी समर्पित करते, असे म्हणत पंकजा मुंडे विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी भावूक झाल्याचे दिसून आले. 


पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर संधी देऊन बुस्टर डोस दिलाय


दरम्यान, आमदार सुरेश धस म्हणाले की, पंकजा मुंडेंचे पुनर्वसन होणं पार्टीच्या दृष्टीने गरजेचं होतं.  सर्व जनतेची आणि कार्यकर्त्यांची मागणी मान्य करण्यात आली आहे. विरोधक टीका काय करतील याचा नेम नाही.  ते काय म्हणतात त्यापेक्षा सर्व मान्य नेतृत्व त्या आहेत. सगळ्यांना अपेक्षा होती त्यांच्या पुनर्वसनची आणि पार्टीने ते केलं आहे.  यावेळी मात्र मागील 5 वर्ष संधी दिली नाही हे देखील दुःख कार्यकर्त्यांमध्ये होतं.  पण आता पार्टीने निर्णय घेतला आहे आणि आम्ही त्याचं स्वागत करतो.  अधिक जोमाने आम्ही येणाऱ्या निवडणूकीत सामोरं जाऊ. पंकजा ताई यांना संधी देऊन आम्हाला बूस्टर डोस दिला आहे. त्यांना मंत्रिपदाची संधी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी त्यांनी यावेळी केली.  


भाजपकडून विधानपरिषदेसाठी कुणाला संधी? 



  • पंकजा मुंडे

  • योगेश टिळेकर

  • परिणय फुके 

  • अमित गोरखे

  • सदाभाऊ खोत


इतर महत्वाच्या बातम्या 


Manoj Jarange: पंकजा मुंडेंना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी, मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...


Devendra Fadnavis on Pankaja Munde : केंद्रीय नेतृत्वाकडून पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...