उल्हासनगर : खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला एकेकाळचा कुख्यात डॉन सुरेश उर्फ पप्पू कलानी याला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण त्याला सुनावण्यात आलेली जन्मठेप ही 'मरेपर्यंत' असल्याचा कुठलाही उल्लेख उच्च न्यायालयाच्या आदेशात नसल्याचा दावा कलानीच्या वकिलांनी केला आहे.

पप्पू कलानी हा उल्हासनगरमधील इंदर भटीजा हत्याप्रकरणात कारागृहात असून आत्तापर्यंत त्याने साडेतेरा वर्ष शिक्षा भोगली आहे. कैद्याची कारागृहात चांगली वागणूक असल्यास 14 वर्षांच्या पुढची शिक्षा माफ करण्याची तरतूद असून त्यानुसार पप्पू कलानीने येरवडा कारागृहाच्या अधीक्षकांकडे याबाबतचा अर्ज केला होता. मात्र त्याची शिक्षा ही 'मरेपर्यंत' जन्मठेपेची असल्याचं सांगत मृत इंदर भटीजा यांचा भाऊ कमल भटीजा यांनी यावर हरकत घेतली होती.

मात्र मुळात सत्र न्यायालय किंवा उच्च न्यायालयाने पप्पू कलानीची जन्मठेप ही आजीवन असल्याचा कुठलाही उल्लेख आदेशात केलेला नसल्याचा कलानी कुटुंबाचा दावा आहे. भटीजा हे जाणीवपूर्वक आपली बदनामी करत असल्याचा आरोप पप्पू कलानीचा मुलगा ओमी कलानी आणि वकील भोजराज जेसवानी यांनी केला आहे.

तसंच पप्पू कलानीच्या सुटकेच्या मागणीबाबत येरवडा कारागृहाने विठ्ठलवाडी पोलिसांकडून अभिप्राय मागवला होता, मात्र हा गुप्त अहवाल बाहेर उघड कसा झाला? असा सवाल करत पोलिसांवर कारवाईची मागणी करणार असल्याचंही ओमी कलानी यांनी सांगितलं आहे.

पप्पू कलानी हा सध्या खुनाच्या गुन्ह्यात मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. वयाच्या सत्तरीत असलेला पप्पू कलानी सध्या पुण्याच्या येरवडा कारागृहात आहे. 1990 साली झालेल्या इंदर भटीजा हत्याप्रकरणात पप्पू याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यात त्याने 1990 ते 1997 आणि त्यानंतर 2019 ते 2019 अशी एकूण साडेतेरा वर्ष कारागृहात घालवली आहेत.

पप्पू कलानी हा माजी आमदार असून त्याची पत्नी ज्योती कलानी या उल्हासनगरच्या राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार आहेत तर सून पंचम ओमी कलानी या उल्हासनगरच्या महापौर आहेत.