मुंबई : आत्मविश्वास, प्रबळ इच्छाशक्ती आणि चित्रकलेच्या बळावर कसारा इथले कला शिक्षक सुनील सूर्यवंशी यांनी कोरोनावर मात केली आहे. सुनील सुर्यवंशी यांनी कोविड केंद्रात उपचार घेणाऱ्या रुग्णांची आणि कोविड योद्ध्यांची चित्रे रेखाटून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण केला.
कोरोनाच्या संकटात सुनील सुर्यवंशी यांच्यावर एक बाका प्रसंग ओढावला. कोरोनाच्या लाटेत त्यांच्या कुटुंबात कोरोनाने प्रवेश केला. त्यांच्या कुटुंबातील आई-वडिलांना कोरोनाची बाधा झाली होती. दुर्दैवाने त्यांच्या सेवानिवृत्त शिक्षक असलेल्या वडिलांचं निधन झालं. तर आई रुग्णालयात उपचार घेत होती. असं असताना खचून न जाता धैर्याने सूर्यवंशी यांनी तोंड दिलं.
सुनील सूर्यवंशी यांची काही दिवसांपूर्वीच अचानक तब्येत खालावली होती. कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. टिटवाळा इथल्या रुक्मिणीबाई कोविड केअर सेंटरमध्ये O2 बेडवर उपचारासाठी दाखल झाले. मात्र त्यांना केंद्रात दाखल असलेल्या इतर रुग्णांच्या चेहऱ्यावरील भीती आणि चिंता पहायला मिळाली. यावेळी सुर्यवंशी यांनी त्यांच्या पत्नीकडून कागद आणि पेन्सिल मागवली. त्या दिवसांपासून सूर्यवंशी या संवेदनशील कलाकाराने आपल्या तोंडावर ऑक्सिजन मास्क असताना देखील उपचारासाठी दाखल झालेले इतर रुग्ण, कोरोना रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर्स, नर्सेस आणि स्वच्छता करणारे कर्मचारी यांचे हुबेहूब चित्र रेखाटण्यास सुरुवात केली. बारा दिवसात त्यांनी 25 जणांच्या प्रतिकृती तयार केल्या. या चित्रामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद देत सूर्यवंशी यांनी देखील कला आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर सहज विजय मिळविला. तब्येत खराब असतानाही त्यानी उपचारादरम्यान रेखाटलेली चित्रे आणि प्रतिमा रुग्ण तसंच कोविड योद्ध्यांना देत त्यांचा सन्मानही केला. त्यांनी कोरोना वर मात करत केलेला उपक्रम नक्कीच प्रेरणा देणारा आहे.