Pahalgam Attack: काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. यामध्ये डोंबिवतीलीत तीन पर्यटकांचा समावेश होता. अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले हे तिघेजण आपल्या कुटुंबीयांसोबत काश्मीरला फिरायला गेले होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी निर्घृणपणे (Pahalgam Attack) त्यांना गोळ्या घालून ठार केले. या सगळ्यानंतर 'एबीपी माझा'ने अतुल मोने यांच्या पत्नी आणि मुलीशी संवाद साधला. या दोघींच्या डोळ्यांदेखतच दहशतवाद्यांनी अतुल मोने (Atul Mone), हेमंत जोशी आणि संजय लेले यांना गोळ्या घालून ठार मारले. दहशतवादी धर्म विचारुन पर्यटकांना गोळ्या घालत होते का, हा प्रश्न अतुल मोने यांच्या पत्नी आणि मुलीला विचारण्यात आला. त्यावर अतुल मोने यांच्या पत्नी आणि मुलीने सांगितले की, दहशतवाद्यांनी कॉमनली विचारलं होतं, इथे कोण-कोण हिंदू आहे? दहशतवाद्यांनी हिंदू आणि मुस्लिमांना वेगवेगळे व्हायला सांगितलं. पण कोणीही रिप्लाय दिला नाही, सगळे जमिनीवर झोपून होते. दहशतवाद्यांनी प्रत्येकाला हिंदू आहे असे विचारुन गोळ्या घातल्या का, हे आम्हाला माहिती नाही. कारण त्यावेळी आम्ही प्रचंड मानसिक धक्क्यात होतो. आम्हाला या सगळ्याकडे बघायला वेळ मिळाला नाही, असे मोने यांच्या पत्नी आणि मुलीने सांगितले. (Dombivli News)
सुरुवातीला गोळीबार सुरु झाला तेव्हा मला काय सुरु आहे, हे कळत नव्हते. दहशतवाद्यांनी इकडे हिंदू कोण आहे, असा प्रश्न विचारला. तेव्हा संजयकाकाने (संजय लेले) हात वर केला. तेव्हा दहशतवाद्यांनी त्याच्या डोक्यात गोळी मारली. त्यानंतर हेमंत काका (हेमंत जोशी) दहशतवाद्यांना काय चाललंय विचारायला गेला तेव्हा दहशतवाद्यांनी त्याच्या तोंडावर गोळी मारली. मग माझे बाबा (अतुल मोने) दहशतवाद्यांना सांगत होते की, कोणालाही मारु नका. माझी आई बाबांना वाचवण्यासाठी त्यांच्यापुढे उभी राहिली. मात्र, दहशतवाद्यांनी बरोबर बाबाच्या पोटात गोळी मारली. 'तुम लोगो ने यहा आंतक मचा के रखा है', असे म्हटले. बाबाला गोळी मारल्यानंतर मी खाली भावापाशी जाऊन झोपले. तेव्हा संजयकाकाचं डोकं माझ्याजवळ होतं. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. मला काय सुरु आहे, हेच कळत नव्हते, असे ऋचा मोने हिने सांगितले.
तिकडे कोणतीच सुरक्षाव्यवस्था नव्हती, जखमींना न्यायला दोन-तीन चॉपर असायला पाहिजे होती
अतुल मोने यांच्या पत्नीने सांगितले की, दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही खाली चाललो होतो. तेव्हा अर्ध्या रस्त्यात लष्कराचे जवान दिसले. ते सगळ्यांशी बोलत वर जात होते. जखमींना नेण्यासाठी वर हेलिकॉप्टर गेले आहे, असे मी ऐकले. पण तिकडे जखमींना नेण्यासाठी दोन-तीन चॉपर असायला हवी होती. बैसरन व्हॅली हे पर्यटनस्थळ असूनही तिकडे कोणतीही सुरक्षाव्यवस्था नव्हती. पोलिसांची चौकी खाली होती. वरतीही सुरक्षा हवी होती, असे अतुल मोने यांच्या पत्नीने सांगितले.
दहशतवाद्यांनी हिंदू कोण आहे विचारल्यानंतर कोणी रिप्लाय दिला नाही. तेव्हा हेमंत आणि माझ्या नवऱ्याने दहशतवाद्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी दोघांना गोळी मारली. नंतर परत विचारलं हिंदू कोण आहे? तेव्हा संजय जीजूंनी हात वर केला, ताई त्यांच्या जवळ होती, तिच्या हातात हिरव्या बांगड्या होती. मग त्यांनाही गोळी मारली. दहशतवाद्यांनी घरातील कर्त्या पुरुषांनाच गोळ्या मारल्या. दहशतवाद्यांनी हिंदू आणि मुस्लीम असे विचारुन गोळ्या मारल्या का, हे आम्ही प्रत्यक्षात बघितले नाही, असे या दोघींनीही स्पष्टपणे सांगितले.
आणखी वाचा