मुंबई : पहलगाम येथील दहशतवादी (Terrorist) हल्ल्यात 27 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून देशभरात संताप व्यक्त होत आहे. दहशतवाद्यांच्या गोळ्यांनी निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याने कुटुंबीयांनी आक्रोश केला आहे. या हल्ल्यात सैन्य दल आणि आयबीमधील अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून नेव्ही दलातील लेफ्टनंट विनय नरवाल यांना दहतवाद्यांनी भेळपुरी खात असताना ठार मारलं. तर, इंटेलिजन्स ब्युरोमधील अधिकारी मनिष रंजन आणि भारतीय वायू सेनेतील (Airforce) अधिकारी कॉरपोरेल टेज हॅलियांग यांनाही वीरगती प्राप्त झाली आहे. भारत देशाच्या सुरक्षा यंत्रणात कार्यतत्पर असलेले हे तीन अधिकारी आपल्या कुटुंबीयांसमवेत पर्यटनासाठी काश्मीरला (Jammu kashmir) गेले होते. मात्र, दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात त्यांना वीरगती प्रात झाली असून आज त्यांना मानवंदना देण्यात आली.
बिहारच्या रोहतास जिल्ह्याच्या आरोही गावातील रहिवाशी असलेले मनिष हे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये कार्यरत होते. सध्या हैदराबादत येथे त्यांची पोस्टींग होती. आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह ते पर्यटनासाठी काश्मीरला पोहोचले होते. मात्र, त्यांचा हाच काश्मीर दौरा त्यांच्या आयुष्यात काळ बनून आला. विशेष म्हणजे कुटुंबातील इतर सदस्य देखील त्यांच्यासमवेत फिरायला सोबत जाणार होते. पण, स्वास्थ अस्वस्थेच्या कारणास्तव त्यांनी जाणं टाळलं. मनिष हे कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ असून त्यांचे दोन भाऊ देखील सरकारी नोकरीत कार्यरत आहेत.
लेफ्टनंट नरवाल विनय यांचा मृत्यू
हरियाणाच्या करनाल येथील मूळचे रहिवाशी असलेल्या आणि नौदलात लेफ्टनंट असलेल्या विनय नरवाला यांचे सात दिवसांपूर्वी 16 एप्रिल रोजी लग्न झालं होतं. विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी हनिमूनसाठी फिरायला गेले होते. काश्मीरमधील पहलागाम येथे हे नवदाम्पत्य भेळपुरी खात असताना अतिरेक्यांनी विनय नरवाल यांना गोळ्या घातल्या. त्यामध्ये, विनय यांचा जागीच मृत्यू झाला, त्यावेळी मृत पतीच्या पार्थिवाजवळ बसून नवविवाहिता हिमांशी टाफो फोडत होती. हिमांशीचा व्हिडिओ आणि तिचा पतीच्या पार्थिवाजवळ बसलेला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर, देशभरात संताप व्यक्त केला जातोय. हाती लग्नातला चुडा भरलेला, 7 दिवसांपूर्वीचा आनंद दु:खाच्या शोकसागरात बुडाला आणि खिन्न मनाने ती मृत पतीच्या शेजारी बसल्याचं दिसून आलं.
नौदलाकडून मानवंदना
भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांना नौदलाकडून मानवंदना देण्यात आली. त्यावेळी, विनय यांच्या पत्नीने आपल्या पतीच्या पार्थिवाला सॅल्यूट करत मानवंदना दिली. आय एम प्राऊड ऑफ यू विनय इव्हरीटाईम जय हिंद... असे म्हणत विनयच्या पत्नीने डोळ्यातून अश्रूंना वाट मोकळी केली. आपल्या वीरगती प्राप्त केलेल्या पतीच्या मृतदेहासमोर 7 दिवसांच्या विधवेनं टाहो फोडल्यानंतर उपस्थितांच्या डोळ्यातही अश्रू तरळले होते.
वायू सेनेचे कॉर्पोरल टेज हॅलियांग यांना वीरगती
भारतीय वायूसेनेचे कॉर्पोरल अधिकारी टेज हॅलियांग हे अरुणाचल प्रदेशच्या लोअर सुबनसिरी जिल्ह्यातील ताजांग गांवचे मूळ रहिवाशी आहेत. श्रीनगर येथील एअरबेसवर ते तैनात होते. सुट्टी घेऊन आपल्या पत्नीसमवेत ते फिरायला पहलगाम येथे आले होते. विशेष म्हणजे हेलियांग यांचेही नुकतेच लग्न झाले होते. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात त्यांना देखील वीरमरण आलं आहे. अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी ट्विट करुन त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलं आहे. तसेच, संपूर्ण देश त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं. दरम्यान, सुदैवाने या हल्ल्यात त्यांची पत्नी बचावली, पण त्यांना मानिसक धक्का बसला आहे.
हेही वाचा
Video: काल मृतदेहासमोर सुन्न होऊन बसली, आज लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!