Cycle Rally : आज पाच जून. आजचा दिवस सर्वत्र जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्तानं देशात दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केलं जातं. पर्यावरण रक्षणाच्या जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जातात. यंदाही मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या वतीनं सायकल चालवण्यानं आपल्या शरीराला होणाऱ्या फायद्यांविषयी जनजागृती करण्यासाठी 'पेडल अप सायकल रॅली' आयोजित करण्यात आली आहे.


चार ते पाच हजार सायकलस्वार सहभागी होणार


जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं सायकल चालवण्याबबत जगजागृती करण्यासाठी तसेच शहरातील सायकलिंग आणि सायकलस्वारांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी मुंबई शहरात पेडल अप सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी साडेपाच वाजता या रॅलीला सुरुवात झाली आहे. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत ही रॅली चालणार आहे. या रॅलीमध्ये चार ते पाच हजार सायकलस्वार सहभागी होणार असून, मुंबईतील वेगवेगळ्या विभागाकडून बांद्रा रिक्लेमेशन येथे एकत्रिक जमतील. सायकल रॅलीला सकाळी साडेसात वाजता सुरुवात होणार असल्याची माहिती मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या वतीनं देण्यात आली आहे.


कसा असेल रॅलीचा मार्ग


दरम्यान, सायकल रॅली वरळी सी लिंक, खान अब्दुल गफार खान रोड, बिंदू माधव चौक जंक्शन, वरळी डेअरी, अब्दुल गफार जंक्शन, डॅा.अॅनी बेझंट रोड, अट्रिया मॉललचस जंक्शन, लाला लजपतराय रोड, सोदामिनी लाईट जंक्शन या मार्गे रॅली मार्गस्थ होऊन हाजी अली जंक्शन येथून डावे वळण घेऊन ताडदेव रेसकोर्स गेट क्रमांक तीन आणि चार येथे सकाळी साडेनऊ वाजता या रॅलीचा समारोप होणार असल्याची माहिती मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी दिली आहे.


तरी पेडल अप सायकल रॅलीचे संबंधी कोणतीही शंका असल्यास वाहतूक नियत्रण कक्ष येथे कार्यान्वित हेल्पलाइन क्रमांक 8454999999 यावर संपर्क करण्याचे आवाहन मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी केलं आहे. 


जागतिक पर्यावरण दिन


जागतिक पर्यावरण दिनाचा (World Environment Day) उगम 1972 मध्ये स्टॉकहोम येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवी पर्यावरण परिषदेत झाला. ही परिषद 5 जूनपासून सुरू झाली आणि 16 जूनपर्यंत चालली. तेव्हापासून जागतिक पर्यावरण दिन हा 5 जून रोजी साजरा करण्यात येतो. पर्यावरणामुळेच आज मनुष्य, प्राणी-पक्षी, किटक यांचं जीवन शक्य आहे. पर्यावरणाशी संबंधित समस्यांना मानवी चेहरा देण्यासोबतच, लोकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरुकता निर्माण व्हावी हा या दिनामागचा मुख्य उद्देश आहे. लोकांमध्ये पर्यावरणाप्रती जागरुकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे आयोजित केला जाणारा जागतिक पर्यावरण दिवस हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे.