मुंबई : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) नव्या प्रकाराची जगभरात दहशत असतानाच, सावधगिरी म्हणून भारतातही फार आधीपासूनच काही महत्त्वाचे निर्णय घेत निर्बंध लागू करण्यात आले. मागील वर्षभरापासून कोरोनाचं संकट भारत आणि संपूर्ण जगापुढं एक मोठं आवाहन होऊन उभं ठाकलं आहे. पण, त्यातही सध्याच्या घडीला भारतात रुग्णसंख्येचा दर दिलासा देणारा ठरत आहे.
एकेकाळी सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या महाराष्ट्रातही सध्या परिस्थिती सुधारत आहे. इतकंच नव्हे, तर झपाट्यानं वाढणारी कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यात मुंबईतील आरोग्य यंत्रणांनाही यश मिळालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत कोरोनामुळं मृत्यू होणाऱ्यांची संख्या अतिशय कमी झाली आहे.
Corona Vaccine | केव्हा आणि कधी मिळणार कोरोनाची लस, जाणून घ्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं
रविवारी मुंबईत कोरोनामुळं तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. मार्च 2020 नंतर कोरोनामुळं मृत्यी होणाऱ्यांचा हा आकडा मोठ्या फरकानं पहिल्यांदाच इतका कमी झाल्याची बाब समोर आली. त्यामुळं हा एक मोठा दिलासा ठरत आहे.
देशातही नव्यानं कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या घटली
कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींच्या आपातकालीन वापराला देशात परवानगी मिळाली असतानाच इथं देशात नव्यानं कोरोनारुग्णांची नोंद होण्याचं प्रमाणही कमी होताना दिसत आहे. एकिकडं पाश्चिमात्य देशांमध्ये नव्या कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळं तणावाची परिस्थिती असतानाच दुसरीकडे भारतातील हे आकडे अतिशय सकारात्मक चित्र दर्शवत आहेत.
मागील सात दिवसांमध्ये दुसऱ्यांदा कोरोनाची रुग्णसंख्या 17 हजारांहून कमी असल्याचं लक्षात आलं आहे. गेल्या 24 तासांत देशात 16504 नव्या कोरोना रुग्णांची माहिती समोर आली. तर, 214 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. यामध्ये एका दिवसात कोरोनावर मात करुन घरी परतणाऱ्यांचा आकडा 19,557 इतका असल्याची बाब समोर आली.