मुंबई : भिवंडी दहावी परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आणखी एकाला अटक झाली आहे. भिवंडी नारपोली भागात राहणाऱ्या इन्तेखाब पटेल याला नारापोली पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी दहावीचा भूमिती, विज्ञान आणि समाजशास्त्राचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला होता.


याप्रकरणी याआधी खासगी क्लास चालक हफिजूर वजीर रहेमान शेखला पोलिसांनी अटक केली होती. कोर्टाने त्याला 26 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज अटक केलेला आरोपी इन्तेखाब पटेल हा देखील भिवंडीमध्ये खासगी क्लास चालवत होता, तसेच विद्यार्थ्यांना घरी जाऊनही शिकवत असे.


इन्तेखाब पटेल आणि रहेमान वजीर शेख एकमेकांच्या संपर्कात होते. इन्तेखाब ज्याठिकाणी शिकवायला जायचा त्या विद्यार्थ्यांना तो एक तास अगोदर पेपर व्हॉट्सअॅपवर पाठवायचा. त्यानंतर इतर ट्युशन ग्रुपवर हा पेपर व्हायरल व्हायचा. आरोपी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून एका पेपरचे तीन हजार रुपये घेत होता, अशी माहिती समोर येत आहे. भिवंडी आणि नारपोली पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.



दहावीचा समाजशास्त्र विषयाचा पेपर परीक्षा सुरु होण्याच्या अर्धा तास आधी व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. त्याआधी 15 मार्च आणि 18 मार्चला विज्ञानाचे पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला होता. भिवंडीतील काल्हेरमध्ये शेतकरी उन्नती मंडळाच्या परशुराम धोंडू टावरे विद्यालयाबाहेर रिक्षात बसलेल्या तीन विद्यार्थिनी परीक्षेची वेळ झाली, तरी परीक्षा केंद्रात येत नसल्याने शिक्षिका विद्या पाटील यांना संशय आला. त्यांनी तपासलं असता विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये दहावीची प्रश्नपत्रिका आढळून आली. त्यानंतर त्या विद्यार्थिनींचे मोबाईल जप्त करण्यात आले होते.


परीक्षा सुरु झाल्यावर आणखी तीन विद्यार्थिनींची तपासणी केली असता त्यांच्या मोबाईलमध्येही तोच प्रकार आढळून आला. या सहा विद्यार्थिनी राहनाळ येथील होली मेरी कॉन्व्हेंट स्कूलच्या इंग्रजी माध्यमाच्या होत्या.