मुंबई : लोकसभा निवडणूक काळात प्रदर्शित होणाऱ्या 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाला मनसेने विरोध केला आहे. लोकसभा निवडणुकांसाठी देशात आचारसंहिता लागू असताना हा सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने घेतला आहे. तसेच सिनेमा प्रदर्शित झाल्यास मनसे स्टाईनने खळ्ळखट्याक करणार असल्याचा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने दिला आहे.


समाजातील किंवा सिनेक्षेत्रातील प्रतिष्ठित लोक मोदी यांच्यावरील सिनेमासाठी आपलं योगदान देत आहेत, असा एक समज या सिनेमाच्या 'पडद्यामागील' लोकांना जाणीवपूर्वक पसरवायचा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना या गलिच्छ प्रचाराचा जाहीर निषेध करते. हा सिनेमा 5 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचं पालन सर्वांनी करावं, असं अपेक्षित असताना सत्ताधारी पक्षच जर आचारसंहितेला असा पायदळी तुडवणार असेल तर हा गैरप्रकार रोखण्यासाठी मनसेलाच खळ्ळखट्याक करावं लागेल, असा इशारा मनसे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.


गीतकार जावेद अख्तर यांच्या नावावरुन वाद


'पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटात जावेद अख्तर यांनी एकही गाणं किंवा संवाद लिहिलेला नाही. तरीही क्रेडिट लाईनमध्ये जावेद अख्तर यांचं नाव आहे. "मला या चित्रपटाच्या पोस्टरवर माझं नाव पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. मी या सिनेमासाठी एकही गाणं लिहिलेलं नाही", असं ट्वीट गीतकार जावेद अख्तर यांनी केलं आहे.


'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय प्रमुख भूमिकेत आहे. बालपासून पंतप्रधानपदापर्यंतचा मोदींचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. बोमन इराणी, ​झरीना वहाब, बरखा बिष्ट सेनगुप्ता, मनोज जोशी आणि प्रशांत नारायणन या कलाकारांचीही सिनेमात मुख्य भूमिका आहे.


रबजीत, मेरी कोम यांसारख्या बायोपिकचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर संदीप सिंह सिनेमाचे निर्माते आहेत. तसेच सुरेश ओबेरॉय देखील निर्मित्यांपैकी एक आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आधीच म्हणजेच 5 एप्रिलला हा चित्रपट थिएटरमध्ये झळकेल.