मुंबई : उद्या महिला दिन (Women's Day) आहे. महिलांचे किंवा सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न विधिमंडळात मांडणाऱ्या महिला प्रतिनिधींसमोर एक नवा प्रश्न उभा राहिला आहे. महिलांना आवश्यक स्वच्छतागृह सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध व्हावी यासाठी अनेक वेळा आवाज उठवला जातो. एनजीओ काम करतात. पण जनतेतून निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींना विधिमंडळात एक स्वच्छ स्वच्छतागृह मिळावे म्हणून देखील झगडावं लागतं, हे चित्र आहे.


महाराष्ट्राचे भव्य विधिमंडळ वीस मजली आहे. अधिवेशनात महाराष्ट्रातून अनेक लोकप्रतिनिधी इथे येतात. या विधिमंडळात वीस ते बावीस महिला आमदार आहेत. पण त्यांच्यासाठी एकच स्वछतागृह असल्याची तक्रार भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी केली आहे. ते ही स्वच्छतागृह अस्वच्छ आणि इतर दालनात न वापरलेले शेवाळ असलेले फर्निचर तिथे वापरण्यात येत असल्याची व्यथा त्यांनी थेट सभागृहात मांडली.


स्वच्छतागृहांची योग्य साफ सफाई होत नाही


महिला दिनाच्या औचित्यावर माधुरी मिसाळ यांनी हा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्राचे विधिमंडळ म्हणजे राज्यसाठी जनतेसाठी योजना बनवणारे कायदे बनवणारे सभागृह आणि इथेच जर महिला आमदारांना स्वछतागृहांची योग्य सुविधा नसेल तर जनतेचे काय हाल असतील असा प्रश्न उपस्थित होतो. कोरोना काळात तर स्वच्छतागृह अस्वच्छ असेल तर अजून जास्त समस्या होऊ शकतील. महिला आमदारांच्या स्वच्छतागृहांची योग्य साफ सफाई होत नाही आणि हे भर सभागृहात सांगण्याची वेळ महिला आमदारांवर यावी हे दुर्दैवी आहे.


फिल्डवर काम करणाऱ्या महिलांना नेहमीच विशेषतः महिला पोलिसांना नेहमीच स्वच्छतागृहाची समस्या भेडसावत असते. पण आता लोकप्रतिनिधींनी पण त्याची व्यथा बोलून दाखवली यावरून याबाबतीत किती दुर्लक्ष केले जाते किंवा या मुद्याला शासन दरबारी महत्व ही दिले जात नसल्याचे चित्र आहे.


महिला आमदारांनी हा मुद्दा मांडल्यावर तरी यावर कारवाई होईल का?महिला आमदारांना चांगले स्वच्छतागृह मिळेल का हा प्रश्नच आहे. पण महिला लोकप्रतिनिधींवर ही वेळ येत असेल तर परिस्थिती बिकट आहे असेच म्हणावे लागेल.