Omicron Variant In Mumbai : दक्षिण आफ्रिकामध्ये उदयास आलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने जगभरात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रामध्येही मोठ्या प्रमाणात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळत आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रमाण मुंबईतील आहे. मुंबईत 370 पेक्षा जास्त ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आहेत. त्यातच आणखी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. कोरोना विषाणू जनुकीय सूत्र निर्धारण (नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग) अंतर्गत सातव्या चाचणीचे बीएमसीने आज निष्कर्ष जाहीर केले आहेत. यामधी एकूण 282 नमुन्यांमध्ये ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे 13 टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे 32 टक्के तर ‘ओमायक्रॉन’चे 55 टक्के रुग्ण आढळले आहेत. 


282 रुग्णांपैकी पैकी फक्त १७ जणांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले. तर ओमायक्रॉन बाधित 156 पैकी केवळ नऊ जणांना रुग्णालयीन उपचारांची गरज भासली आहे. तर संकलित केलेल्या नमुन्यापैकी डेल्टा डेरिव्हेटीव्ह बाधित एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. कोविड 19 विषाणूच्या जनुकीय सूत्राचे निर्धारण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या निर्देशानुसार नियमितपणे केल्या जात आहेत. या अंतर्गत सातव्या तुकडीमध्ये मुंबईतील 282 रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला असून त्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. यात ‘डेल्टा व्हेरिअंट’ चे 13 टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे 32 टक्के तर ‘ओमायक्रॉन’ चे 55 टक्के रुग्ण आढळले आहेत.
  
282 रुग्णांचे वयोगटनिहाय वर्गीकरण पुढीलप्रमाणे आहे.
• 0 ते 20 वर्षे वयोगट  - 46 रुग्ण (16 टक्के)  
• 21 ते 40 वर्षे वयोगट - 99  रुग्ण (35 टक्के)
• 41 ते 60 वर्षे वयोगट - 79 रूग्ण (28 टक्के)
• 61 ते 80 वयोगट - 54 रुग्ण (19 टक्के)
• 81 ते 100 वयोगट - 4 रुग्ण ( एक टक्के)


कोणत्या व्हेरियंटचे किती रुग्ण?
• डेल्टा व्हेरिअंट - 37 रुग्ण (13 टक्के)
• डेल्टा डेरिव्हेटीव्ह - 89 रुग्ण (32 टक्के) 
• ओमायक्रॉन - 156 रुग्ण (55 टक्के)
 
ओमायक्रॉन विषाणू उपप्रकाराची बाधा झालेल्या 156 पैकी फक्त नऊ जणांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी कोणालाही लक्षणे आढळली नाहीत. यासोबत, त्यांना प्राणवायू पुरवठा किंवा अतिदक्षता विभागातही दाखल करावे लागले नाही. असे असले तरी, नागरिकांनी गाफील न राहता दक्ष राहणे गरजेचे आहे. कोरोना विषाणूचा धोका अद्याप टळलेला नसल्याने, नागरिकांनी गाफील न राहता कोविड प्रतिबंधक वर्तन कायम ठेवले पाहिजे. सर्वांनी मास्कचा उपयोग करणे, सुरक्षित अंतर राखणे, हातांची स्वच्छता आदी नियमांचे पालन कठोरपणे करणे आवश्यक आहे. कोविड बाधा निष्पन्न झाल्यानंतर प्रत्येकाने वेळीच व योग्य वैद्यकीय उपचार घेणे देखील आवश्यक आहे. सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीकरण पूर्ण करुन घेणे देखील गरजेचे आहे.