मुंबई: मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील जुना वर्सोवा पूल आज बंद ठेवण्यात येणार आहे.


सकाळी 5 तासांसाठी हा पूल तपासणीच्या कामासाठी बंद ठेवला जाणार आहे. त्यादरम्यान दोन्ही बाजूची वाहतूक नव्यानं बांधण्यात आलेल्या पुलावरून होईल.

यामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं शक्यतो या मार्गानं प्रवास टाळण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

गेल्या वर्षी जुन्या पुलाला तडे गेल्याने तो अनेक दिवस वाहतुकीसाठी बंद होता. परिणामी इथे वाहतूक कोंडीचा प्रश्न सातत्याने होता. पुलाची डागडुजी करुन पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पण पुलाची नियमित तपासणी आवश्यक आहे. शिवाय महाड पूल दुर्घटनेनंतर प्रशासन कोणतीही हयगय करण्यास तयार नाही.

त्यामुळे सध्या या पुलाची वजन पेलण्याची क्षमता, तडे गेलेल्या गर्डरची स्थिती याबाबतची तपासणी करण्यात येणार आहे. यादरम्यान आज सकाळी 8 पासून हा पूल 5 तासांसाठी वाहतुकीसाठी बंद असेल.

त्यामुळे जुन्या पुलावरुन वसई - गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक नव्या पुलावरुन वळवण्यात आली आहे.

वाहतुकीच्या नियोजनासाठी मीरा भार्इंदर वाहतूक शाखेचे 18 ; पालघर शाखेचे 22 तर महामार्ग वाहतूक शाखेचे 11 असे 51 अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

अवजड आणि मोठी वाहनं भिवंडी - चिंचोटी मार्गे वळविण्यात आली आहेत. दर वीस मिनीटांनी नव्या पुलावरुन एका- एका बाजूची वाहनं सोडली जाणार आहेत.