Mumbai Fire evacuation lifts: मुंबईसह राज्यभरातील उंच इमारतीमधील अग्निसुरक्षेच्या दृष्टीनं राज्य सरकारनं (Maharashtra Govt)एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्याच्या ऊर्जा विभागानं महानगरपालिका आणि अग्निशमन विभागाच्या साथीनं जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार यापुढे 70 मीटर आणि त्याहून अधिक उंचीच्या इमारतींमध्ये आता 'फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट' (Fire evacuation lifts) बसवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. या निर्णयामुळे जानेवारी 2018 पासूनच्या या उंच इमारतींसाठी फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट अनिवार्य करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिलं राज्य बनलं आहे.
अग्निशमन दलाला मदत -
'फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट' अनिवार्य केल्यानं अग्निशमन दलाच्या जवानांना आणीबाणीच्यावेळी लोकांचा जीव आणि मालमत्ता वाचवण्यासाठी वरच्या मजल्यापर्यंत पोहोचण्यासाठी अधिक सुरक्षित आणि जलद मार्ग उपलब्ध होऊ शकेल. सध्या अग्निशमन दलाकडे 90 मीटर्स म्हणजे 30 व्या मजल्यापर्यंतच पोहोचू शकतील अश्या हायड्रोलिक शिड्या उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्या वापरावर ब-याच मर्यादा आहेत. त्यामुळे 70 मीटर्स म्हणजे 23 व्या मजल्यांपर्यंतच्या सर्व इमारतींमध्ये या विशेष लिफ्ट अनिवार्य झाल्यास अग्निशमन दलालाही मोठी मदत होणार आहे. आणीबाणीच्या काळात वरच्या मजल्यापर्यंत जलद पोहोचण्यासाठी पाळीव प्राण्यांसह सर्व वयोगटातील 10-18 लोकांच्या गटाला एकाचवेळी तीन मिनिटांपेक्षा कमी वेळेत आणात येतं. म्हणजे 30 मिनिटांत जवळपास 100 लोकांना बाहेर काढण्यास मदत होऊ शकते.
मानांकित निर्मात्यांकडनं लिफ्ट घेणं फायद्याचं
सध्या इव्हॅक्युएशन सोल्यूशन्सचाच एक भाग म्हणून, मुंबईसारख्या शहरांमध्ये अनेक उंच इमारतींच्या विकासकांनी अ-प्रमाणित किंवा कमी दर्जांची फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट स्थापित केलेल्या आहेत. बांधकाम व्यावसायिक हे ब-याचदा प्रवासी लिफ्ट निर्मात्यांद्वारे गुणवत्तेशी तडजोड केलेल्या बिगर मान्यताप्राप्त फायर लिफ्ट बसवतात मात्र आग लागल्यास या अयोग्य लिफ्ट लोकांना योग्य सुरक्षा प्रदान करू शकत नाहीत. याउलट, फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट्स हा अधिक सुरक्षित आणि खात्रीशीर पर्याय ठरणार आहे. कारण फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट या जाणकारांच्या विशेष टीमद्वारे विकसित केल्या जातात.
या नवीन परिपत्रकानुसार आता महाराष्ट्र राज्यात फायर इव्हॅक्युएशन लिफ्टच्या उभारणीसाठी परवानगी आणि रितसर परवाना घेणंही बंधनकारक करण्यात आलेलं आहे. या परिपत्रकाची अंमलबजावणी सध्याच्या फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट इंस्टॉलेशन्ससाठी जारी केल्याच्या तारखेपासून तात्काळ लागू होत विद्यमान फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट इंस्टॉलेशन्सना पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल.ज्यामुळे महाराष्ट्रात 70 मीटर आणि त्याहून अधिक उंचीच्या उंच इमारतींना सुरक्षेच्यादृष्टीनं आवश्यक पायाभूत सुविधा आणि अधिक सुरक्षित पर्याय उपलब्ध होऊन प्रसंगी इमारतीतून बाहेर काढण्याचा अधिक सुरक्षित पर्यायही उपलब्ध होईल.