गेली दोन वर्ष या उमेदवारांकडून पोलीस दलामध्ये समाविष्ट होण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. मात्र अद्याप त्याचा काहीही निकाल लागलेला नाही. प्रसाद पवार यांनी सांगितलं की 2018 मधील उमेदवारांची सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यांची फक्त आरोग्य चाचणी (मेडिकल) बाकी आहे. ज्यानंतर ते पोलिस सेवेत रुजू होऊ शकतात. तर दुसरीकडे ज्या 10 हजार पोलीस भरती निघणार आहेत. त्यांची पूर्ण प्रक्रिया सरकारला पहिल्यापासून राबवावी लागेल. ज्याला खूप वेळ जाऊ शकतो आणि खर्चही लागणार आहे. म्हणून जर 2018 मधील वेटिंग लिस्टमध्ये असलेल्यांना पोलिस दलात रुजू केलं गेलं तर त्यामुळे सरकारचा पैसा आणि वेळही वाचेल. या 10 हजार भरत्या टप्प्या-टप्प्याने होणार असून याचा कालावधी निश्चित नाही.
तर राकेश माने यांच्या मते कोरोनाचा प्रादुर्भाव कधी संपेल माहीत नाही. जसं शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा सरकार घेत नाहीय तर मग भर्ती कशी करणार? दुसरीकडे पोलिसांच्या ज्या मैदानात भर्ती प्रक्रिया किंवा मैदानी परीक्षा घेतल्या जातात त्या ठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आली आहेत. अशा परिस्थितिमध्ये परीक्षा घेणार कशी? हा मोठा प्रश्न आहे.
राज्यात लवकरच 10 हजार जागांसाठी पोलीस भरती, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा
पोलीस दलात आपले कर्तव्य बजावण्याचे कित्येकांचे स्वप्न असतं आणि हेच स्वप्न उराशी बाळगून वर्षभर ही लोकं तयारीला लागतात. यांच्या दिवसाची सुरुवात पहाटे चार वाजता होते. पहाटे उठून मैदानी परीक्षेसाठी तयारी करण्यापासून ते लेखी परीक्षेसाठी बौद्धिक तयारी करण्यामध्ये यांचा दिवस निघून जातो. पोलीस भरतीसाठी वयाची अट असल्यामुळे प्रत्येक संधी ही शेवटची संधी असते असं समजून पोलीस दलात भरती होण्यासाठी ही लोक तयारी करत असतात. काहींची कुटुंब पोलीस दलात असतात आणि कुटुंबाची परंपरा कायम राहावी म्हणून पोलीस दलात सेवा बजावण्याचे यांचे स्वप्न असतं. ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असतात.
2018 मधील पोलिस भरतीमध्ये कमी जागांची भरती झाल्यामुळे सिलेक्ट होणाऱ्या मुलामुलींना वेटींगमध्ये राहावे लागले. 5 वर्ष मेहनत घेऊन काही मार्क्ससाठी वेटींगला राहिलेल्यांचे वय संपले आहे. ते पुढील कोणत्याही भरतीसाठी पात्र होऊ शकत नाहीत. बहुतांश लोकांची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. तर काहीजण गरीब शेतमजुरांची मुले आहेत. त्यामुळे सरकारला हात जोडून यांनी विनंती की, एक वर्ष कोणतेही मानधन न घेता एक प्रकारे आर्थिक मदत करू शकतो. त्यामुळे सरकारने योग्य तो विचार करावा ही कळकळीची विनंती या उमेदवारांकडून करण्यात आली आहे.
सुरुवातीला कुठल्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता काम करण्याची तयारी उमेदवारांनी दाखवली असून सरकारने यांच्या भर्ती संदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा ही अपेक्षा आहे, असं या उमेदवारांनी सांगितलंय.