मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात साथ रोग नियंत्रण कायद्याखाली खासगी रुग्णालयांना 80 टक्के बेड्स ठरवलेल्या दरात उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र काही मोठे रुग्णालये बेडस् रिकामे असतानाही गरजूंना उपलब्ध करून देत नसल्याचं समोर आलं होतं. या प्रकारानांतर मुंबईतील हिंदुजा, जसलोक, बॉम्बे आणि लीलावती रुग्णालयांना राज्याच्या आरोग्य विभागाने नोटीस बजावली आहे. या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.


खासगी रुग्णालयांनी 80 टक्के बेड्स उपलब्ध करुन देणे आणि गरीबांसाठी 10% बेड आरक्षित ठेवण नियामानुसार अपेक्षित आहे. मात्र या आदेशाचं पालन खासगी रुग्णालयांकडून होत नाही. काल रात्री आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या रुग्णालयांना अचानक भेट दिली, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालये चार्जेसचे चार्टही लावत नसल्याचं समोर आल्याने राज्य सरकारने ही कारवाई कारवाई केली आहे.


मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारी आणि महापालिकेच्या रुग्णालयांची क्षमता हळूहळू संपत आहे. त्यामुळे मुंबईतील खासगी रुग्णालयांतील 80 टक्के बेड्स उपलब्ध करुन देण्याचे आदेश आहेत. मुंबईतील गरजू आणि गरीब रुग्णांना रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध झाले पाहिजेत. रुग्णालयांनी चार्जेसचा चार्ट लावला पाहिजे. रुग्णालयांना नोटीस पाठवून गरजूंना बेड्स मिळतात की नाही, आदेशांचं पालन होत आहे की नाही याची खात्री करून घेत आहेत. या रुग्णालयामध्ये रुग्णांना बेड उपलब्ध असतील तर ते मिळालेच पाहिजेत. मी आरोग्यमंत्री या नात्याने स्वत: रुग्णालयांना भेट दिली आणि हे सहन केला जाणार नाही असा संदेश देण्याचा प्रयत्न केला. तसेच रुग्णालयांनी रुग्णांना बेड्स उपलब्ध करुन दिले नाही, तर कायदेशीर कारवाई करु, असा इशाराही राजेश टोपे यांनी यावेळी दिला.