मुंबई : महापालिकेत बदलत्या राजकीय समीकरणांमुळे अमराठी नगरसेवकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या निवडणुकीत 61 अमराठी नगरसेवक होते, तर यावेळी हा आकडा 73 वर गेला आहे. यामध्ये 23 गुजराती, 12 उत्तर भारतीय आणि एका दक्षिण भारतीय नगरसेवकाचा समावेश आहे.


73 पैकी तब्बल 36 अमराठी नगरसेवक भाजपकडून निवडून आले आहेत. त्यात 23 गुजराती, 12 उत्तर भारतीय आणि एका दक्षिण भारतीयाचा समावेश आहे. भाजपकडून एकही मुस्लीम नगरसेवक निवडून आलेला नाही. तर शिवसेनेकडून निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये चार अमराठी नगरसेवकांचा समावेश आहे.

निवडून आलेल्या अमराठी नगरसेवकांची पक्षनिहाय संख्या

  • गुजराती – 23 भाजप, 1 शिवसेना

  • उत्तर भारतीय – 12 भाजप, 1 शिवसेना, 1 काँग्रेस

  • मुस्लीम – 9 काँग्रेस, 1 अपक्ष, 2 सेना, 6 राष्ट्रवादी, 6 सपा, 3 एमआयएम

  • दक्षिण भारतीय – 2 काँग्रेस, 2 शिवसेना, 1 भाजप

  • ख्रिश्चन – 3 काँग्रेस


मुंबई महापालिकेत नेहमीच मराठी नगरसेवकांचं वर्चस्व राहिलं आहे. पाच वर्षांपूर्वी 17 गुजराती, 15 उत्तर भारतीय, तर 21 मुस्लीम नगरसेवक मुंबईकरांचं प्रतिनिधित्व करत होते. यावेळी उत्तर भारतीय नगरसेवकांची संख्या वाढलेली नसली तरी गुजराती नगरसेवकांची संख्या 17 वरून 24 वर पोहोचली आहे. यातील 23 नगरसेवक एकट्या भाजपचे, तर एक नगरसेवक शिवसेनेचा आहे.

24 नगरसेवकांपैकी 16 गुजराती नगरसेवक हे पश्चिम उपनगरातून निवडून आले आहेत. पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये कांदिवली आणि मालाड या पट्ट्यात सात हिंदी भाषिक, तर संपूर्ण शहरात 15 हिंदी भाषिक नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळेच दहिसर ते मालाड या भागात भाजपने 11, तर काँग्रेसकडून तब्बल 23 हिंदी भाषिक उमेदवारांना तिकीट दिलं होतं.

शिवसेनेचे तीन हिंदी भाषिक उमेदवारही याच पट्ट्यात होते. या भागातून यावेळीही सात उत्तर भारतीय, तर संपूर्ण शहरातून 14 उत्तर भारतीय नगरसेवक निवडून आले. यात 12 भाजपचे, एक सेनेचा, एक काँग्रेसचा नगरसेवक आहे.

उमेदवारांची संख्या

  • शिवसेनेने 227 पैकी 7 गुजराती, 5 मुस्लीम, 4 उत्तर भारतीय उमेदवार दिले होते.

  • भाजपने 195 पैकी 120 मराठी, 30 गुजराती, 25 उत्तर भारतीय, तर 5 मुस्लीम उमेदवार दिले होते.

  • काँग्रेसने 227 पैकी 115 मराठी, तर 22 गुजराती, 33 उत्तर भारतीय आणि 42 मुस्लीम उमेदवार दिले होते.