मुंबई : खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आणखी एक डेडलाईन दिली आहे. राज्यात 15 डिसेंबरपर्यंत एकही खड्डा सापडणार नाही. तसेच खड्डा दाखवणाऱ्यास बक्षिसासाठी घोषणाही त्यांनी यावेळी केली. गेल्या चार वर्षात 15 डिसेंबरनंतर माझ्याकडून कोणीही बक्षिस जिंकू शकलेलं नाही, असा दावाही चंद्रकांत पाटलांनी एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझा व्हिजन' या कार्यक्रमात केला.


राज्य सरकारच्या तिजोरीत पुरेसे पैसे नसल्याने रस्त्ये बांधणीवरील बजेट कमी होतं. मी मंत्री झालो त्यावेळी रस्तेनिर्मितीसाठी 1700 कोटी रुपयांचं बजेट होतं. हे बजेट आम्ही वाढवून आता 6 हजार कोटी केलं आहे. चार वर्षात कमी पैशांमध्ये जे रस्ते झाले, ते कधी पक्के झालेच नाहीत, अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा व्हिजन या कार्यक्रमात दिली.


वाहतुकीच्या तुलनेत रस्ते कमी पक्के होते. अनेक अवजड वाहनांमुळे पक्के नसलेले रस्ते वारंवार खराब होत गेले. त्यामुळे पावसाळ्यानंतर रस्ते दुरुस्ती करणे हा वर्षानुवर्षाचा क्रम राहिला. त्यामुळे या वर्षीही 15 डिसेंबरपर्यंत जर एकही खड्डा राज्यात सापडणार नाही आणि 15 डिसेंबरनंतर राज्यातील रस्त्यावर खड्डा दाखवल्यास त्याला बक्षिस नक्की मिळेल, असं ही चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.


राज्यात पावसाळ्यातही रस्ते खराब होऊ नयेत यासाठी आम्ही केंद्र सरकारकडून चार वर्षात 1 लाख 6 हजार कोटी रुपये आणले. त्यामुळे या पैशांच्या मदतीने राज्यात पक्के रस्ते तयार होतील, ज्यामुळे पुढील अनेक वर्ष रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत, असं आश्वासनही चंद्रकांत पाटलांनी यावेळी दिली.