मुंबई : राज्यातील भाजप सरकारच्या सत्ता स्थानपनेनंतर सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसने बाहेरुन पाठिंबा दिला होता. त्यानंतर शिवसेनेने या सरकारला पाठिंबा दिला. तसेच हे सरकार युतीनं नाही, तर केवळ भाजपचं असल्याचा दावा शिवसेनेचे नेते, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केला आहे.


एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमात रावते बोलत होते. शिवसेना आगामी निवडणुका भाजपसोबत न लढता, स्वबळावरच लढणार असल्याचा पुनरुच्चार दिवाकर रावते यांनी यावेळी केली.


माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्याशी संवाद साधला. राज्य सरकारला उद्या 4 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं सरकारच्या चार वर्षातील कार्यक्रमाचा आढावा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेतला जात आहे.


शिवसेनेने सर्वसामान्यांचे प्रश्न आमच्या पद्धतीने काम करून सोडवण्याचे प्रयत्न करत आहोत आणि त्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. भाजप आणि शिवसेनेमध्ये मतभेद असले तरी मंत्रिमंडळामध्ये निर्णय घ्यायचे असतात. वाद मंत्रिमंडळात घालायचे असतात, मात्र ते जनतेमध्ये येऊन सांगायचे नसतात. कारण सरकार जनतेचे असतं ते कोणत्या पक्षाचं नसतं, असंही रावते म्हणाले.


आम्ही सरकारमध्ये बसून जनसामान्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी आम्ही सरकारमध्ये आहोत, असं रावते म्हणाले.