मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना प्रचलित दरापेक्षा वाढीव मदत मिळणार आहेत. कोसळलेल्या पक्क्या घरांसाठी दीड लाख रुपये, तर बहुवार्षिक शेतीच्या नुकसानीसाठी हेक्टरी 50 हजार रुपयांप्रमाणे मदत देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. निसर्ग चक्रीवादळामुळे अडचणीत आलेल्या कोकणासह राज्यातल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी राज्य शासन विविध माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.


निसर्ग चक्रीवादळामुळे पक्क्या घराचं पूर्णत: नुकसान झालेल्या कुटुंबांना सुधारित दरांनुसार दीड लाख रुपये मदत मिळेल. पक्क्या किंवा कच्च्या घरांचं अंशत: (किमान 15 टक्के) नुकसान झालेल्या कुटुंबांना 15 हजार रुपये मिळतील. नष्ट झालेल्या झोपडीसाठी 15 हजार रुपये मदत मिळेल. घर पूर्णत: कोसळलेल्या कुटुंबांना कपडे व भांड्यांच्या खर्चासाठी प्रत्येकी 5 हजार प्रमाणे एकूण 10 हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. नुकसानग्रस्त दुकानमालक व टपरीचालकांना नुकसानीच्या 75 टक्के मर्यादेत कमाल 10 हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. बहुवार्षिक शेतीच्या नुकसानीपोटी प्रतिहेक्टरी 50 हजार रुपयांप्रमाणे कमाल दोन हेक्टरसाठी मदत मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.


अजित पवार पुढे म्हणाले की, निसर्ग चक्रीवादळाने कोकणातील तसेच राज्यातील काही भागात नागरिकांचं झालेलं नुकसान मोठं आहे. यांना अधिक दरानं मदत करण्याची गरज होती. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) आणि केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधीतून (एनडीआरएफ) देण्यात येणाऱ्या प्रचलित दरांपेक्षा वाढीव मदत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं 9 जूनच्या बैठकीत घेतला आहे. त्यामुळे चक्रीवादळानं नुकसान झालेल्या घरांच्या, शेतीच्या, कौटुंबिक साहित्यापोटी संबंधित कुटुंबांना आता प्रचलित नियमांपेक्षा अधिक दरानं मदत मिळणार आहे.
‘एसडीआरएफ’ आणि ‘एनडीआरएफ’च्या निकषानुसार सध्या पक्क्या घराचं पूर्णत: नुकसान झालेल्या कुटुंबांना 95 हजार 100 ते 1 लाख 1 हजार 900 रुपये मदत मिळत होती. नवीन निर्णयानुसार या कुटुंबांना आता दीड लाख रुपये मिळतील.

कच्चा किंवा पक्क्या घरांचं अंशत: (किमान 15 टक्के) नुकसान झालेल्या कुटुंबांना पूर्वी 6 हजार रुपये मिळत होते त्यांना आता 15 हजार रुपये मिळतील. जर कुणाची झोपडी नष्ट झाली असेल तर पूर्वी 6 हजार रुपये मिळत होते, त्यांनाही आता 15 हजार रुपये मिळतील. घर पूर्णत: क्षतीग्रस्त झालेल्या कुटुंबांना कपडे व भांड्यांसाठी प्रत्येकी 5 हजार प्रमाणे एकूण 10 हजार रुपये मदत मिळणार आहे. नुकसानग्रस्त दुकानमालक व टपरीचालकांना नुकसानीच्या 75 टक्के मर्यादेत कमाल 10 हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. बहुवार्षिक शेतीच्या नुकसानीपोटी पूर्वी 18 हजार रुपये प्रतिहेक्टर, दोन हेक्टरच्या कमाल मर्यादेत मिळत होते. त्याऐवजी आता प्रतिहेक्टरी 50 हजार रुपयांप्रमाणे कमाल दोन हेक्टरसाठी मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अशी माहिती अजित पवार यांनी दिली.


नुकसानग्रस्तांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी कुटुंबे निश्चित करण्यात येतील. त्यानंतर मदतीची रक्कम संबंधीत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. चक्रीवादळामुळे रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला आहे. वीजेचे खांब कोसळले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत वादळानं बाधित असलेल्या रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील बाधित शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी 5 लिटर केरोसीन मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अजित पवारांनी सांगितलं.


 

Nisarga Cyclone Damage | निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानानंतर कुणाला कशी आणि किती मदत मिळणार?