मुंबई : मुंबई महानगर पालिकेची सध्याची 227 ही नगरसेवक संख्या अधिक नऊने वाढवून 236 इतकी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला. त्या निर्णायाला आता भाजप नगरसेवक अभिजीत सामंत आणि राजश्री शिरवाडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेची मुदत येत्या फेब्रुवारी 2022 मध्ये संपणार आहे. त्यातच राज्यातील अन्य महापालिका आणि नगरपालिकांमधील सदस्य संख्याही वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर मुंबई पालिकेची सध्याची 227 ही वॉर्डसंख्या नऊने वाढवून 236 इतकी करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईच्या लोकसंख्येत झालेली वाढ आणि वाढतं नागरीकरण लक्षात घेऊन मुंबईतही नगरसेवक संख्या वाढविण्याची भूमिका मंत्रिमंडळानं घेतली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात 3.87 टक्के इतकी लोकसंख्या वाढ साल 2001 ते 2011 या काळात झालेली होती. त्याआधारे 2021 पर्यंतची लोकसंख्या वाढ गृहित धरून ही वॉर्ड संख्या वाढविण्यात आली आहे. त्याला भाजपा नगरसेवकांनी आक्षेप घेत याचिका दाखल केली आहे.
'वॉर्डमधील ही वाढ घटनाबाह्य'
साल 2001 मधील जनगणणेच्या आधारावर 221 वरून नगरसेवकांची संख्या 227 करण्यात आली होती. त्यानंतर साल 2011 च्या जनगणणेच्या आधारावर नगरसेवकांच्या संख्येत वाढ न करता प्रभाग रचनेत बदल करण्यात आले होते. त्याच आधारावर मुंबई महानगर पालिकेच्या साल 2017 मधील निवडणूका पार पडल्या. मात्र, 2020-21 मध्ये कोविडाचा प्रादुर्भाव तसेच टाळेबंदीमुळे यंदाची जनगणणा होऊ शकली नाही. त्यासाठी नव्यानं जनगणणा करून प्रभाग रचनेसह सदस्यांची संख्येत वाढ होणं अपेक्षित आहे. मात्र असं असलं तरी साल 2022 साठी 2011 च्या जनगणणेला ग्राह्य धरता येणार नाही. त्यामुळे ही प्रभाग रचना घटनाबाह्य आणि असंविधानिक असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी या याचिकेतून केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना चकाचक रस्ते? रस्त्यांसाठी महापालिका तब्बल 2 हजार 200 कोटी खर्च करणार
- कोर्टाचा अवमान केल्याबद्दल तुमच्यावर कारवाई का करू नये? मुंबई उच्च न्यायालयाचा नवाब मलिकांना सवाल
- BMC Elections: मुंबई महापालिकेतील सदस्य संख्या वाढीला मंजुरी, अशी आहे आकडेवारी...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha