मुंबई: भारतात सध्या वृद्ध लोकांची संख्या वाढतेय आणि बहुतेक राज्यांमधील प्रजनन दर कमी होत आहे, पण त्याचसोबत बँकांच्या व्याजदरात वाढ होतेय असं झिरोधाचे सहसंस्थापक निखिल कामत (Nithin Kamath) यांनी मत व्यक्त केलं आहे. सध्याचा भारतीय गृहनिर्माण बाजार कशा स्थितीत आहे, त्यामध्ये काय बदल होत आहे यावर झिरोधाचे (Zerodha) निखिल कामत यांनी भाष्य केलं आहे. मुंबईत जर तुम्ही कमी भाडे देऊन राहत असाल तर अपार्टमेंट का खरेदी कराल असा सवाल त्यांनी केला आहे.


निखिल कामत यांनी ट्वीट थ्रेडच्या माध्यमातून यावर भाष्य केलं आहे. ते म्हणतात की, सध्या निवासी भाड्याचे उत्पन्न हे सरासरी तीन टक्के इतकं आहे, जे वाढत्या महागाईच्या जवळपासही जात नाही. ज्या ज्या वेळी भारतातील काळ्या पैशावर नियंत्रण आणण्यासाठी पाऊलं उचलली जातात, त्या त्या वेळी गृहनिर्माण क्षेत्रावर त्याचा परिणाम होताना दिसतोय. जेव्हा तुम्ही आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी एकत्रितरित्या मालमत्ता विकल्यास रिअल इस्टेट अधिक अतरल बनेल. 


 






मग मुंबईतील 1000 स्केअर फूट अपार्टमेंटची किंमत एवढी कशी काय? जर तुम्ही कमी भाडे देऊन राहत असाल तर तुम्ही ते का खरेदी कराल? असा सवाल निखिल कामत यांनी विचारला आहे. 


याआधी, जुलैमध्ये कामथ यांनी ट्वीटच्या थ्रेडमध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना काय केलं पाहिजे यासंबंधी माहिती दिली होती. त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं की, "जर उत्पन्न ऋणात्मक असल्यास, महागाईवर मात करण्यासाठी रिअल इस्टेटची किंमत दर वर्षी किमान 10 टक्क्यांनी वाढली पाहिजे किंवा दर 7 वर्षांनी किंमत दुप्पट व्हायला लागेल."


त्यांनी पुढे स्पष्ट केले की, "घर तुम्हाला आर्थिक आणि भावनिक सुरक्षा प्रदान करेल. परंतु पूर्वीप्रमाणे आता सेवानिवृत्तीसाठी तुम्हाला आर्थिक परतावा मिळवून देणार नाही. रिअल इस्टेटच्या किमती स्टॉक, रिअल इस्टेट, क्रिप्टो आणि इतर बाजारांसारख्या चांगल्या मूलभूत गोष्टींशिवाय देखील वाढू शकतात परंतु किमती जास्त काळ टिकत नाहीत."


रिअल इस्टेटसाठी, भाडे उत्पन्न हा सर्वोत्तम उपाय आहे असं निखिल कामत म्हणतात. ते म्हणतात की, ''अर्थात स्टॉक्सप्रमाणेच रिअल इस्टेटच्या किमतीही चांगल्या वाढू शकतात. सहसा असे घडते तेव्हा स्टॉक, रिअल इस्टेट, क्रिप्टो या किमती जास्त काळ टिकत नाहीत. रिअल इस्टेटसाठी भाड्याने मिळणारे उत्पन्न हे कदाचित मूलभूत गोष्टींचे सर्वोत्तम उपाय आहेत. रिअल इस्टेट ही खाजगी बाजारातील मुल्यांकनांप्रमाणेच तरल आहे. वास्तविक किंमत विरुद्ध शेवटची व्यवहार केलेली किंमत ही कमी असू शकते. दुसरी जोखीम म्हणजे निश्चित किंमत असल्याने स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंड प्रमाणे तुम्ही SIP च्या माध्यमातून किंमतीतील चढउतारांचा फायदा घेऊ शकत नाही."


 







मालमत्ता सल्लागार कंपनी असलेल्या अॅनारॉकने ( Anarock) 2 ऑक्टोबर रोजी दिलेल्या अहवालात असे नमूद केले आहे की जानेवारी-सप्टेंबर या कालावधीत देशातील सात शहरांमधील घरांची विक्री 87 टक्क्यांनी वाढून 2,72,709 युनिट्सवर पोहोचली आहे.  घरांच्या जोरदार मागणीमुळे कोरोना पूर्व काळातील विक्रीपेक्षाही जास्त विक्री आता झाल्याचं दिसून आलं आहे. 2021 च्या जानेवारी-सप्टेंबर या कालावधीत 1,45,651 युनिट्सची विक्री झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.


महागाई रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने या वर्षी मे महिन्यापासून आतापर्यंत रेपो दरात 190 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. त्यामुळे गृहकर्जावरील व्याजदरात वाढ जरी झाली असली तरीही त्याचा विक्रीवर फारसा परिणाम झाला नसल्याचं स्पष्ट झालंय. मात्र घरांच्या किमतीही गेल्या वर्षभरात किमान 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत.