Sheena Bora Murder Case: देशभरात गाजलेल्या शीना बोरा हत्याकांड प्रकरणात एक खळबळजनक दावा पुन्हा करण्यात आला आहे.  शीना बोरा अजूनही जिवंत असल्याचा दावा इंद्राणी मुखर्जीचे वकील रणजित सांगळे यांनी मुंबई सत्र न्यायालयात केला आहे.  राहुल मुखर्जीच्या मोबाईल मधील संभाषण आणि मेसेज यावरून सिद्ध होतं की शीना अजूनही जिवंत आहे, असं इंद्राणीचे वकील रणजित सांगळे यांनी म्हटलं आहे.  या प्रकरणात महत्वाचा साक्षीदार राहुल मुखर्जीच्या उलटतपासणी दरम्यान अनेक प्रश्नांवर उत्तर देण्यास टाळाटाळ केली आहे.  शीना बोरा जिवंत असल्याची पुन्हा चौकशी करण्यात यावी अशी मागणी इंद्राणी मुखर्जीचे वकील रणजित सांगळे यांनी केली आहे.


शीना बोरा प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात विशेष सीबीआय कोर्टात  साक्षीदार राहुल मुखर्जीची उलटतपासणी सुरू आहे.  यापूर्वी देखील इंद्राणी मुखर्जीतर्फे शीना बोरा जिवंत असल्याचा दावा करत चौकशी करण्याची मागणी करत सीबीआय कोर्टात अर्ज केला होता. 


शीना बोरा जिवंत आहे आणि राहुलला माहिती आहे की ती कुठं आहे. किंवा त्यानं काय केलंय ते माहिती नाही. त्या दोघांचे रेग्युलर संबंध होते. त्यांचे एकमेकांना पाठवलेले मेसेजेस आहेत. तो शेवटचा व्यक्ती होता, जो शीना बरोबर होता. त्यामुळं त्याला शीना कुठं आहे? हा प्रश्न विचारायला हवा होता, असं वकिलांनी म्हटलं आहे. तिला काश्मिरमध्ये कुणीतरी बघितलं होतं अशी माहिती आली होती, त्याबाबत कोर्टाला देखील कळवण्यात आलं होतं. तिला जर खरंच कुणी तिकडे पाहिलं असेल तर पोलिसांनी तशी स्टेटमेंट रेकॉर्ड केली आहेत का. आताच्या परिस्थितीत नवे पुरावे समोर येत आहेत. साक्षीदार वैतागून का होईना खरं बोलत आहे. त्यामुळं त्याची चौकशी व्हायला हवी, असं वकिलांनी म्हटलं आहे. खटला अद्याप न्यायप्रविष्ठ आहे, त्यामुळं पुढं काय होतंय ते महत्वाचं आहे, असं वकील रणजित सांगळे यांनी म्हटलं आहे.


इंद्राणी मुखर्जीनंही पत्र लिहित केला होता शीना जिवंत असल्याचा दावा


याआधी या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जीनं जानेवारी महिन्यात सीबीआयला 9 पानी पत्र लिहित यामध्ये शीना बोरा जिवंत असल्याचं म्हटले होते.  शीना बोरा जिवंत असून तिला काश्मीरमध्ये आशा कोरके या महिला पोलीस अधिकाऱ्याने पाहिलंय, असा दावा इंद्राणी मुखर्जीनं आपल्या पत्रात केला होता. कैदेत असलेल्या इंद्राणी मुखर्जीनं सीबीआयला नऊ पानी पत्र लिहिलं होतं. शीनाचा काश्मीरमध्ये तपास करण्याची विनंतीही यामध्ये करण्यात आली होती. आशा कोरके यांनी दिलेली माहितीनंतर इंद्राणी मुखर्जीने तत्कालीन CBI अधिकारी सुबोध जयसवाल यांना पत्र लिहिले होते. या पत्रात इंद्राणीने CBI समोर जबाब नोंदवण्यासही तयार असल्याचं सांगितले होते. 


काय आहे प्रकरण? - 
24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. इंद्राणीचा चालक शामवर रायला बेकायदेशीर हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे इंद्राणीला साल 2015 मध्ये अटक करण्यात आली. इंद्राणीचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि शामवर राय यांनी मिळून पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली आणि त्यांच्याच मदतीनं 25 एप्रिल 2012 रोजी तिच्या मृतदेहाची विल्टेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये अखेर हे प्रकरण उघडकीस आलं. इंद्राणीने वांद्र्यात शीनाची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी रायगड गाठलं होतं. पोलिसांनी इंद्राणीसोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्नालाही हत्या आणि पुरावे मिटवल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. सीबीआयने कटात सहभागी असल्याने पीटर मुखर्जीलाही अटक केली होती. 2020 मध्ये त्याला जामीन देण्यात आला. खटला सुरु असतानाच पीटर मुखर्जी आणि इंद्राणीचा घटस्फोट झाला.