मुंबई: डी गॅंगशी संबंधित खंडणी प्रकरणी सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रुटला 15 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर इतर सहा आरोपींना 18 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रुट आणि रियाझ भाटी हे दोघेही टेरर फंडिंग प्रकरणात अटकेत आहेत.
सलीम फ्रुट हा छोटा शकीलचा साडू आहे. तक्रारदाराला डी गॅंग आणि छोट्या शकीलच्या नावानं तो धमकी द्यायचा. तसेच तक्रारदाराची महागडी रेंज रोव्हर गाडी त्याने जबरदस्तीने ताब्यात घेतली होती. आरोपींनी जबरदस्तीनं 65 लाखांची रोख रक्कमही ताब्यात घेतली होती.
या प्रकरणात हवालामार्गे पैसे बाहेर पाठवण्यात आल्याचा आरोप एनआयएने त्यांच्या आरोपपत्रात केला आहे. याप्रकरणी समीर खान, अजय गोसालिया, फिरोज चमडा, अमजद रेडकर आणि जावेद खान हे इतर पाच आरोपी आहेत. या सर्व आरोपींमध्ये नियमित संभाषण झाल्याचे पुरावे एनआयएच्या हाती आहेत. या आरोपींचा परदेशातही नियमित संवाद असल्याचे पुरावे आहेत.
एनआयएने केलेल्या या आरोपात काहीही तथ्य नसून ही रचलेली कथा असल्याचं आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. सलीम फ्रुट आणि रियाझ भाटी यांना जबरदस्तीने या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. न्यायालयीन कोठडीत असलेल्या सलीम आणि रियाझ यांना या गुन्ह्यात पोलिसांनी अडकवल्याचा आरोप त्यांनी केला.
मात्र सरकारी वकिलांचा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. या नव्या खंडणी गुन्ह्यातही सलीम फ्रुट आणि रियाझ भाटी आरोपी असल्याने त्यांच्या विरोधात संघटीत गुन्हेगारीचं कलम लावण्यात आलं आहे.
कोण आहे सलीम फ्रुट?
सलीम फ्रूट हा छोटा शकीलचा साडू आहे. छोटा शकील त्याला आपल्या मुलाप्रमाणे वागवतो. छोटा शकीलच्या पत्नीच्या धाकट्या बहिणीशी सलीमचा विवाह झाला आहे. सलीमचे वडील उमर कुरेशी हे मुंबईतील नल बाजार परिसरात फळे विकायचे. त्यामुळे सलीमला सलीम फ्रूट म्हणून संबोधले जाते.
या टोळीत सामील होण्यापूर्वी सलीम दुबईला फळे निर्यात करायचा. दुबईमध्ये त्याचा एक आलिशान बंगला देखील आहे. सलीमविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, एनआयएने मुंबईतील माहीम भागातील सुहेल खंडवानी यांच्या घरावर छापा टाकला होता. खांडवानी हे मुंबईतील माहीम दर्गा आणि हाजियाली दर्ग्याचे विश्वस्त आहेत. घरावर छापा टाकल्यानंतर एनआयएचे अधिकारी त्यांना माहीम येथील त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले आणि तेथेही त्यांची चौकशी करण्यात आली.
या प्रकरणात NIA ने अब्दुल कय्युम नावाच्या व्यक्तीची देखील चौकशी करत आहे, जो 1993 च्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी होता. परंतु, नंतर खटल्याच्या वेळी पुराव्याअभावी विशेष टाडा न्यायालयाने सर्व आरोपातून त्याला निर्दोष मुक्त केले.