Andheri East Bypoll Election 2022: निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या मशाल या नव्या चिन्हासह शिवसेना ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) गट आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाला आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी(Andheri East Bypoll Election) शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पक्षात पडलेली फूट, त्यानंतर निवडणूक चिन्ह असलेले धनुष्यबाण गोठवले जाणे आणि शिवसेना हे नाव वापरण्यास मनाई, या धक्क्यानंतर आता शिवसैनिक नव्या आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज झाले आहेत. पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.


शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. शिवसेना या पोटनिवडणुकीत उतरण्याआधीच पक्षात मोठी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात 40 आमदारांनी बंड केल्यानंतर थेट पक्षावर दावा केला. त्यामुळे शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे गटाची लढाई कोर्टात आणि निवडणूक आयोगात सुरू झाली आहे. 


निवडणूक आयोगाने शिवसेना हे मूळ नाव वापरण्यास मनाई करताना धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवलं. त्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना स्वतंत्र नाव आणि चिन्ह दिले. ठाकरे गटाला शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले. तर, शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव दिले आहे.


शिवसेना 'मशाल'सह निवडणुकीच्या रिंगणात


शिवसेना ठाकरे गटाला मशाल मिळाल्याने शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.  अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने आमदार दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. गुरुवारी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गट शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. 


काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा


शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवली जाणार आहे. 


भाजप की शिंदे गटासोबत लढत?


भाजपने या निवडणुकीत मुराजी पटेल या उमेदवाराची घोषणा केली आहे. पटेल यांनी निवडणुकीची तयारीदेखील सुरू केली आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाने अद्यापही याबाबत कोणीतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. शिंदे गटातील काही आमदारांनी ही निवडणूक लढवण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे वृत्त आहे. मुराजी पटेल हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात होते. त्यावेळी ते दुसऱ्या स्थानी होते. शिवसेना उमेदवार रमेश लटके यांनी त्यांचा 16 हजारांहून अधिक मतांनी त्यांचा पराभव केला होता.